जोकोविचच्या मार्गात नदाल, फेडरर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:39 AM2019-05-25T04:39:45+5:302019-05-25T04:39:54+5:30
फ्रेंच ओपन; सेरेनाचा पहिल्यांदाच संभाव्य विजेत्यांमध्ये नाही
पॅरिस : सर्व चारही ग्रँडस्लॅम दोनदा जिंकण्याचा मान मिळविण्यासाठी नोवाक जोकोविच याला यंदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकविणे आवश्यक आहे. तथापि, त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नसून त्याला राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
जागतिक टेनिसमध्ये अव्वल स्थानी असलेल्या जोकोविचला फेडरर व नदाल यांच्यावर विजय मिळविण्यासाठी झगडावे लागेल. स्पर्धेची पात्रता फेरी २० मेपासून सुरू झाली असून, मुख्य फेरीला २६ मेपासून सुरुवात होईल.
जोकोने याआधी २०१६ मध्ये चारही ग्रँडस्लॅम जिंकले. त्याने २०१८ ला विम्बल्डन व अमेरिकन जेतेपद पटकविले होते. यंदा जानेवारीत त्याने सातव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. जोकोविचने आतापर्र्यत १५ ग्रँडस्लॅम जिंकले असून, फेडरर व नदाल यांनी अनुक्रमे २० तसेच १७ विजेतेपदांसह आघाडीवर आहेत. डाँन बुडगे १९३८ तसेच रॉड लावेर (१९६२ व १९६९) यांनी एकावेळी चार ग्रँडस्लॅम जिंकले होते. (वृत्तसंस्था)
महिलांमध्ये सिमोना हालेप दावेदार
दुखापतींमुळे त्रस्त असलेली दिग्गज खेळाडू सेरेना विलियम्स ही २० वर्षांत प्रथमच फ्रेंच ओपनच्या संभाव्य विजती नसेल. याशिवाय क्रमवारीत अव्वल स्थान पटकविणारी जपानची नाओमी ओसाका हिच्यापुढेही स्वत:चे स्थान टिकविण्याचे आव्हान असेल. या दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये नसल्याने गत विजेती सिमोना हालेप हिला जेतेपदाची प्रबळ दावेदार मानले जाते. हालेपला स्पर्धेत तिसरे मानांकन मिळाले.