रोम : ‘क्ले कोर्टचा बादशहा’ राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद उंचावले. अंतिम फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाचा दिग्गज नोव्हाक जोकोविच याचा तीन सेटमध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पराभव केला.
नदालने कारकिर्दीतील ३४वे मास्टर्स जेतेपद पटकावताना जोकोविचचे कडवे आव्हान ६-०, ४-६, ६-१ असे परतावले. राफाने पहिला सेट एकही गेम न गमावता निर्विवादपणे जिंकत सामन्यात दिमाखात सुरुवात केली. मात्र, झुंजार जोकोने दमदार पुनरागमन करत दुसरा सेट जिंकून सामन्यात रंग भरले. यावेळी सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. मात्र, नदालने तुफानी खेळ करताना तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा एकतर्फी वर्चस्व राखताना जेतेपदावर नाव कोरले. या शानदार विजेतेपदासह नदालने आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशाराही दिला आहे.
फ्रेंच ओपनमध्ये विक्रमी १२व्या विजेतपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार असल्याचे सांगताना नदालने म्हटले की, ‘ फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकण्यासाठी मी खूप उत्साहाने प्रतीक्षा करत आहे. त्या स्टेडियममध्ये खेळण्याची मजाच वेगळी आहे. या स्पर्धेच्या आधी झालेल्या माझ्या तयारीवर मी खूश आहे.’ (वृत्तसंस्था)