रोटरडम : नुकताच आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकाविणा-या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने युवा खेळाडूंनाही लाजवेल, असे यश मिळवले होते. या यशाचा आनंद अजूनही संपलेला नाही. फेडररने पुन्हा कमाल केली. त्याच्यासाठी वय हे केवळ आकडे आहेत. या आकड्यांवर मात करीत त्याने यशोशिखर गाठले. ३६ व्या वर्षात एटीपी मानांकनात सर्वाेच्च स्थान पटकाविण्याची किमया फेडररने साधली.यशाचे शिखर गाठण्यासाठी वयाचे बंधन नसते, हे सिद्ध करून दाखवत तो पुन्हा एकदा जगात पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू बनला. रोटरडम ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर फेडररने हा विक्रम रचला. तो नंबर वन स्थान मिळवणारा सर्वात वयोवृद्ध असा खेळाडू ठरला.फेडररने उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात नेदरलॅँडच्या टॉमी हास याचा ४-६, ६-१, ६-१ ने पराभव केला. त्याला पहिला क्रमांक मिळविण्यासाठी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. त्यात तो यशस्वी झाला. आता त्याने स्पेनच्या राफेल नदालची जागा काबीज केली. तोसद्धा ३६ वर्षे आणि १९५ दिवसांचा आहे. त्याने आंद्रे अगासी याचा विक्रम मोडला. अगासी हा २००३ मध्ये ३३ वर्षे आणि १३१ दिवस असा वयाने सर्वात मोठा खेळाडू होता.फेडरर म्हणाला, पुन्हा एकदा नंबर वन होणे हे माझ्या खेळाबाबत खूप काही सांगून जाते. वास्तवात मी कधीही विचार केला नव्हता, की मी या वयात नंबर वन स्थानावर पोहोचेन. माझ्या कारकिर्दीतील हा महत्त्वपूर्ण क्षण आहे. मी याचा आनंद घेत आहे.2012 मध्ये फेडरर नंबर वन स्थानावर होता. अशा प्रकारे तो पाच वर्षे आणि १०६ दिवसांनंतर पुन्हा नंबर वनवर पोहोचला आहे. जो एक विक्रमच आहे. अगासी याने १९९६ नंतर १९९९ मध्ये म्हणजे ३ वर्षे आणि १४२ दिवसांनंतर नंबर वनचा किताब मिळवला होता. गेल्या महिन्यात फेडररने आॅस्ट्रेलियन ओपनच्या रूपात २० वे ग्रॅण्डस्लॅम पटकाविले आहे. तोसुद्धा ऐतिहासिक विक्रम आहे.अगासीचे ट्विटफेडररला खूप खूप शुभेच्छा. ३६ वर्षे १९५ दिवस. रॉजर फेडरर खेळाचा स्तर उंचावत आहे. पुन्हा एक उल्लेखनीय यश.