इंडियन वेल्स : प्रजनेश गुणेश्वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल इवो कार्लोविचविरुद्ध पराभूत झाल्यामुळे खंडित झाली. भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेशनला क्रोएशियन खेळाडूविरुद्ध ३-६, ६-७ (४-७) ने पराभव स्वीकारावा लागला. ही लढत एक तास १३ मिनिटे रंगली.पहिला सेट एकतर्फी झाल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये प्रजनेशने जबरदस्त झुंज देताना कार्लोविचला चांगली लढत दिली. यावेळी सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मोक्याच्यावेळी प्रजनेशने केलेली माफक चूक निर्णायक ठरली. याचा अचूक फायदा उचलत कार्लोविचने बाजी मारत पुढच्या फेरीत प्रवेश केला.जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानावर असलेला प्रजनेश म्हणाला,‘त्याची भेदक सर्व्हिस परतविणे सोपे नव्हते. माझ्याकडे काही संधी होत्या, पण त्याचा लाभ घेण्यात मी अपयशी ठरलो. त्याचा प्रभाव सामन्याच्या निकालावर झाला.’ प्रजनेश प्रथमच एटीपी मास्टर्स स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यात त्याने चमकदार कामगिरी करीत ६१ गुण मिळविले. याचा त्याला जागतिक क्रमवारीत मोठा फायदा होणार असून तो आता कारकिर्दीमध्ये सर्वोत्तम ८२ व्या स्थानी येईल.दरम्यान, भारताचा रोहन बोपन्ना व त्याचा सहकारी डेनिस शापोवालोव यांना दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोव्हिच व फॅबियो फोगनिनी यांच्याविरुद्ध ६-४, १-६, ८-१० ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालासह बोपन्ना-शापोवालोव जोडीचे आव्हान संपुष्टात आले.जागतिक क्रमवारीत तिसरा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेवलाही गाशा गुंडाळावा लागला. नोव्हाक जोकोविचची तिसºया फेरीतील लढत पावसामुळे पूर्ण झाली नाही. जागतिक क्रमवारीत ५५ व्या स्थानी असलेल्या जॉन लनार्ड स्ट्रफने पाच सामन्यांत प्रथमच झ्वेरेवला ६-३, ६-१ असे नमवले. (वृत्तसंस्था)
प्रजनेश गुणेश्वरचे आव्हान संपुष्टात; बोपन्नाही पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 4:24 AM