नवी दिल्ली : भारतीय टेनिस खेळाडू प्रज्नेश गुणेश्वरन याने सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन एकेरी टेनिस रँकिंगमध्ये दोन स्थानांनी आघाडी घेतली आहे. तो आता ८८ व्या स्थानावर आहे. तर युवा खेळाडू सुमित नागल याने ३०३ वे स्थान मिळवले.दुहेरीत द्विज शरण ४१ वे रँकिंग सोबत अव्वल भारतीय खेळाडू बनला आहे. रोहन बोपन्नाला दोन स्थानांनी फटका बसला तो ४२ व्या स्थानावर आहे. एकेरी रँकिंगमध्ये अव्वल भारतीय प्रज्नेश गेल्या आठवड्यात कोणत्याही स्पर्धेत खेळला नाही. मात्र त्याने ६२९ या रेटिंग गुणांसह चार स्थानांनी सुधारणा केली आहे. २१ वर्षांच्या नागल याने गेल्या आठवड्यात एटीपी टूर चॅलेंजरच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्याचा फायदा त्याला मिळाला. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान सहन करावे लागले आहे. ते अनुक्रमे १४५ आणि २४८ व्या स्थानावर आहेत. शशीकुमार मुकुंद २८७ व्या क्रमांकावर आहे. दुहेरीत द्विज शरण आणि बोपन्नासोबतच जीवन नेदुंचे झियान (७२), पुरव राजा (८०) आणि लिएंडर पेस (८३) हे देखील अव्वल शंभरमध्ये आहेत. प्रार्थना ठोंबरे हिने महिला दुहेरीत १५० वे रँकिंग मिळवले आहे.
प्रज्नेशला ८८ वे स्थान, द्विज भारतीय खेळाडूत अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:39 AM