पुणे ओपन आयटीएफ महिला टेनिस : भारताच्या अंकिता रैनाची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 09:12 PM2018-11-27T21:12:04+5:302018-11-27T21:13:37+5:30
ऋतुजा भोसले, स्नेहल माने, जेनिफर लुईखेम या भारतीयांचे आव्हान मात्र संपुष्टात
पुणे : विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी भारताची अंकिता रैना हिने अपेक्षेनुसार खेळ करीत २५ हजार डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरी गटातून मंगळवारी विजयी सलामी दिली. ऋतुजा भोसले, स्नेहल माने आणि जेनिफर लुईखेम या भारतीयांचे आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.
नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील एमएसएलटीए स्कूल आॅफ टेनिस येथे सुरू आहे. दुसऱ्या मानांकित अंकिताने लौकिकाला साजेशी खेळ करताना रशियाच्या अमिना अंशाबाचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडविला. भारताची अवव्ल खेळाडू असलेल्या अंकिताने अमिनावर निर्विवाद वर्चस्व गाजवित बाजी मारली. रशियाच्या मरिना मेलनिकोवाने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या जेनिफर लुईखेमचे आव्हान टायब्रेकमध्ये ७-६ (२), ६-३ असे परतवून लावले. पहिल्या सेटमध्ये झुंजार खेळ करणाºया लुईखेमला दुसºया सेटमध्ये मरिनाने फारशी संधीच दिली नाही.
पुण्याची गुणवान खेळाडू ऋतुजा भोसले कडव्या संघर्षानंतर चीनच्या कै-लीन झाँग हिच्याकडून ७-६ (६), ७-६ (५)ने पराभूत झाली. भारताच्या ऋतुजा भोसलेने विजयासाठी चांगलेच झुंजवले. संपूर्ण सामन्यात दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. मात्र, दोन्ही सेटमध्ये निर्णायक क्षणी खेळ उंचावता न आल्याने ऋतुजा स्पर्धेबाहेर झाली.
सहाव्या मानांकित इस्राईलच्या डेनिझ खझानुक हिने भारताच्या स्नेहल मानेला ६-३, ६-१ असे नमविले. युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवा हिने सातव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या कॅटी ड्युनचा ६-१, ६-३ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. आठव्या मानांकित नेदरलँडच्या क्युरिनी लेमणीने क्वालिफायर स्लोव्हेनियाच्या पीआ कूकचे आव्हान ६-१, ६-१ असे संपुष्टात आणले.
निकाल : पहिली फेरी :
एकेरी गट : तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. या-सुआन ली (तैपेई) ६-३, ६-३. अंकिता रैना (भारत) वि. वि. अमिना अंशाबा (रशिया) ६-२, ६-१. मरिना मेलनिकोवा (रशिया) वि. वि. जेनिफर लुईखेम (भारत) ७-६ (२), ६-३. कै-लीन झाँग (चीन) वि. वि. ऋतुजा भोसले (भारत) ७-६ (६), ७-६ (५). डेनिझ खझानुक (इस्राईल) वि. वि. स्नेहल माने (भारत) ६-३, ६-१. व्हॅलेरिया स्राखोवा (युक्रेन) वि. वि. कॅटी ड्युन (ग्रेट ब्रिटन) ६-१, ६-३. क्युरिनी लेमणी (नेदरलँड) वि. वि. पीआ कूक (स्लोव्हेनिया) ६-१, ६-१. ओल्गा दोरोशिना (रशिया) वि. वि. कॅतरझायना कावा (पोलंड) ६-३, ६-२. रेका-लुका जनी (हंगेरी) वि. वि. कायलाह मॅकफी (आॅस्ट्रेलिया) १-६, ७-६ (२), ७-६ (३). जॅकलिन अॅडिना क्रिस्टियन वि. वि. मियाबी इनाऊ (जपान) ६-१, ७-५. जिया-जिंग लू (चीन) वि. वि. कॅटरझयाना पीटर (पोलंड) ६-१, २-६, ६-४
दुहेरी गट : अलेक्झांड्रा नेदिनोवा (बल्जेरिया)-तामरा झिदनसेक (स्लोव्हेनिया) वि. वि. मारिया मारफुतीना (रशिया)-अॅना मोर्जिना (रशिया) ६-१, ६-०. अॅना वेसलिनोविच-याशिना इक्तेरिना (रशिया) वि. वि. मरीम बोलकवडेझ (जॉर्जिया)-अल्बिना खबिबुलीना (उझबेकिस्तान) ७-६ (२), ६-४.