मुंबई : ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरेच्या कारकिर्दीची अखेर पराभवाने झाली. ऑस्ट्रेलियन ओपन ही आपली अखेरची स्पर्धा असल्याचे मरेने जाहीर केले होते. पण खरे तर त्याला विम्बल्डन स्पर्धा खेळायची होती. पण मग अशी काय गोष्ट घडली की त्यामुळे मरेला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्येच कारकिर्द थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
ग्रेट ब्रिटनला पहिल्यांदा विम्बल्डनचे जेतेपद जिंकवून देणाऱ्या टेनिसपटू मरेला अखेर पराभवाने अलविदा करावा लागला. ऑस्ट्रेलियन ओपन ही आपली अखेरची स्पर्धा असल्याचे मरेने स्पष्ट केले होते. पण या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत मरेला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत मरेला स्पेनच्या रॉबर्टो बाऊटिस्टा अग्युटने 6-4, 6-4, 6-7, 6-7, 6-2 असे पराभूत केले.
मरे हा कमरेच्या दुखण्याने हैराण होता. या दुखण्यामुळे खेळावर मर्यादा येत असल्याचे मरेने म्हटले होते. त्यामुळेच आंतरराष्ट्री स्तरावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय मरेला घ्यावा लागला. मरेने गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधून कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
एका पत्रकार परिषदेमध्ये मरे म्हणाला होता की, " विम्बल्डन स्पर्धा खेळून टेनिसला अलविदा करणे मला आवडले असते. पण या दुखापतीने आता डोके वर काढले आहे. या दुखापतीमुळे मला जास्त काळ टेनिस खेळता येणार नाही. "