नदालचा विक्रमी ‘फ्रेंच किस’, बाराव्यांदा मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 09:31 AM2019-06-10T09:31:38+5:302019-06-10T09:33:55+5:30
स्पेनच्या दिग्गज राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना विक्रमी १२व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावले.
पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेवर आपलेच राज्य असते अशा तोऱ्यात खेळताना स्पेनच्या दिग्गज राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना विक्रमी १२व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावले. चार सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याचा ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. नदालने यासह आपल्या कारकिर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम जिंकले.
सामना चार सेटचा रंगला, मात्र नदालच्या धडाक्यापुढे तो सामना एकतर्फी झाला. पहिला सेट गमावल्यानंतर थिएमने दुसरा सेट जिंकून सामन्यात रंग भरले. यावेळी थिएम ऐतिहासिक कामगिरी करणार असे दिसत होते. मात्र नदालने आपणच ‘फ्रेंच’ किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करताना सलग दोन सेट मोठ्या फरकाने अगदी सहजपणे जिंकत थेट सामनाच जिंकला. तिस-या व चौथ्या सेटमध्ये नदालच्या वेगवान व आक्रमक खेळापुढे थिएमला आपला खेळ करताच आला नाही. यासह एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे तब्बल १२वेळा जेतेपद पटकावणारा नदाल टेनिसविश्वातील एकमेवळ खेळाडू ठरला. त्याचबरोबर सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शर्यतीत नदाल आघाडीवर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररहून केवळ २ जेतेपदांनी मागे राहिला आहे. फेडररने सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
“All the things that I went through probably give me that extra passion when I am playing."
— Roland-Garros (@rolandgarros) June 10, 2019
Read up on Rafael Nadal's post-final thoughts: https://t.co/Y94af054Wo#RG19pic.twitter.com/D8sI3Pwh9G
विशेष म्हणजे यासह मागील १० विजेतेपदांवर नदाल, फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांनीच कब्जा केला असल्याने टेनिसविश्वात याच ‘बिग थ्री’चे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. संपूर्ण सामन्यात केवळा दुसरा सेट अटीतटीचा रंगला. दोघांनीही आपापल्या सर्विस राखल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला. येथे केलेली माफक चूक थिएमसाठी फायदेशीर ठरली आणि त्याने सामन्यात बरोबरी साधली. मात्र यानंतर नदालने जबरदस्त खेळ करताना थिएमला आव्हानही निर्माण करू दिले नाही.
>सलग चार दिवस खेळून गाठली अंतिम फेरी
डॉमनिक थिएमने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सलग चार दिवस खेळल्यानंतर अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळेच त्याचा थकवा अखेरच्या दोन सेटमध्ये स्पष्टपणे दिसला. चौथ्या सेटच्या पहिल्या आणि तिसऱ्या गेममध्ये थिएमने ब्रेक पॉइंटची संधी मिळवली होती. पण त्यात तो अपयशी ठरला.