पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेवर आपलेच राज्य असते अशा तोऱ्यात खेळताना स्पेनच्या दिग्गज राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना विक्रमी १२व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावले. चार सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याचा ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. नदालने यासह आपल्या कारकिर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम जिंकले.सामना चार सेटचा रंगला, मात्र नदालच्या धडाक्यापुढे तो सामना एकतर्फी झाला. पहिला सेट गमावल्यानंतर थिएमने दुसरा सेट जिंकून सामन्यात रंग भरले. यावेळी थिएम ऐतिहासिक कामगिरी करणार असे दिसत होते. मात्र नदालने आपणच ‘फ्रेंच’ किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करताना सलग दोन सेट मोठ्या फरकाने अगदी सहजपणे जिंकत थेट सामनाच जिंकला. तिस-या व चौथ्या सेटमध्ये नदालच्या वेगवान व आक्रमक खेळापुढे थिएमला आपला खेळ करताच आला नाही. यासह एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे तब्बल १२वेळा जेतेपद पटकावणारा नदाल टेनिसविश्वातील एकमेवळ खेळाडू ठरला. त्याचबरोबर सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शर्यतीत नदाल आघाडीवर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररहून केवळ २ जेतेपदांनी मागे राहिला आहे. फेडररने सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
नदालचा विक्रमी ‘फ्रेंच किस’, बाराव्यांदा मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 9:31 AM