लंडन : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने विक्रमी नवव्या विम्बल्डन जेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना ‘हायव्होल्टेज’ उपांत्य सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला. दुसरीकडे, सर्बियाचा जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना अंतिम फेरीत धडक मारली.संपूर्ण टेनिसविश्वाचे लक्ष लागलेल्या सामन्यात फेडररने दमदार खेळ करताना नदालला ७-६ (७-३), १-६, ६-३, ६-४ असे नमविले. पहिला सेट अपेक्षेप्रमाणे अटीतटीचा रंगला. यावेळी फेडररने टायब्रेकमध्ये बाजी मारली खरी, मात्र यानंतर नदालने जबरदस्त मुसंडी मारताना दुसरा सेट सहजपणे जिंकला.नदाल पुन्हा एकदा फेडररला धक्का देणार असेच दिसत होते. परंतु, ग्रास कोर्टवर आपलेच राज्य असल्याचे सिद्ध करताना फेडररने नंतरचे सलग दोन सेट जिंकून दिमाखात अंतिम फेरी गाठली. ३ तास २ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात फेडररने कोणतीही घाई न करता नियंत्रित खेळ करून नदालला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.दुसरीकडे, सलग दुसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या जोकोविचने झुंजार खेळ केला. चार सेटमध्ये बाजी मारताना जोकोविचने स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टा आगुटचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला.पहिला सेट जिंकून अपेक्षित आघाडी घेतल्यानंतर दुसºया सेटमध्ये आगुटने बाजी मारत सामना १-१ असा बरोबरीत केला. यानंतर जोकोविचने सलग दोन सेट जिंकताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. आता जोको जेतेपदासाठी फेडररविरुद्ध भिडेल. (वृत्तसंस्था)
रॉजर फेडररने दिला नदालला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 4:57 AM