रॉटरडॅमः गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावून २०व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या टेनिस सम्राट रॉजर फेडररनं आणखी एक पराक्रम गाजवला आहे. 36 वर्षं १९५ दिवस वयाचा फेडरर काल पुन्हा जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी विराजमान झाला. तो आत्तापर्यंतचा 'सर्वात वयस्कर अव्वल नंबरी टेनिसपटू' ठरला आहे. हा आनंद पुन्हा फेडररच्या अश्रूंमधून व्यक्त झाला आणि या दिग्गजाला सर्व प्रेक्षकांनी जागेवर उभं राहून मानवंदना दिली.
स्वित्झर्लंडचा स्टार रॉजर फेडररनं फेब्रुवारी २००४ मध्ये कारकिर्दीत पहिल्यांदा पहिल्या स्थानी झेप घेतली होती. त्यानंतर, सर्वाधिक काळ हे स्थान कायम राखण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. पण, ऑक्टोबर २०१२ नंतर, म्हणजेच गेल्या सहा वर्षांत फेडररला पुन्हा हे स्थान पटकावता आलं नव्हतं. गेल्या वर्षी त्यानं दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि इतरही अनेक जेतेपदं पटकावली, पण तो दुसऱ्या क्रमांकापर्यंतच मजल मारू शकला होता. यंदा मात्र, ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद आणि नंतरची विजयी घोडदौड त्याला सर्वोच्च स्थानी घेऊन गेली.
नेदरलँड्सच्या रॉबिन हास याचा ४-६, ६-१, ६-१ असा पराभव करत रॉजर फेडररनं रॉटरडॅम ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आणि त्या गुणांच्या जोरावर स्पेनच्या रफाएल नदालला मागे टाकत पहिला नंबर पटकावला.
माजी टेनिसवीर आंद्रे आगासीनं ३३ वर्षं १३१ दिवस वय असताना 'अव्वल नंबरी' कामगिरी केली होती. तोच आत्तापर्यंत सर्वात वयस्कर अव्वल नंबरी टेनिसपटू होता. फेडररनं हा विक्रम मोडल्यानंतर आगासीनंही त्याचं अभिनंदन केलं.
ही कामगिरी माझ्यासाठी खूपच विशेष आहे. मी खूप आहे, समाधानी आहे. अव्वल स्थान पुन्हा मिळवू शकेन, असं मला खरंच वाटलं नव्हतं. त्यामुळे हा क्षण माझ्या कारकिर्दीतील लक्षणीय, अविस्मरणीय आहे, अशा भावना रॉजर फेडररनं व्यक्त केल्या.