रॉजर फेडररचा ‘दस का दम’, दहाव्यांदा जिंकली हाले एटीपी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 03:43 AM2019-06-24T03:43:59+5:302019-06-24T03:46:06+5:30
टेनिस स्टार रॉजर फेडरर याने विम्बल्डनपूर्वी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा देताना हाले एटीपी स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद पटकावले.
वेस्टफालेन (जर्मनी) : टेनिस स्टार रॉजर फेडरर याने विम्बल्डनपूर्वी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा देताना हाले एटीपी स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद पटकावले. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात स्वित्झर्लंडच्या फेडररने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला.
३७ वर्षीय फेडररने पहिला सेट टायब्रेंकमध्ये जिंकल्यानंतर दुसरा सेट सहजपणे जिंकताना गॉफिनचा ७-६, ६-१ असा दणदणीत पराभव केला. यासह आपल्या कारकिर्दीतील १०२ विजेतेपद पूर्ण करतानाच फेडररने हाले स्पर्धा तब्बल दहाव्यांदा जिंकली. या शानदार विजेतेपदासह आत्मविश्वास उंचावलेला फेडरर पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत नवव्या जेतेपदासाठी प्रयत्न करेल. याआधी शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात फेडररने पिएरे ह्यूजेस हर्बर्ट याचा ६-३, ६-३ असा पराभव केला होता.
ही अविश्वसनीय कामगिरी आहे. मी जेव्हा पहिल्यांडा या स्पर्धेत खेळलो होतो, तेव्हा कधीही विचार केला नव्हता की मी येथे दहावेळा जेतेपद उंचावेल. याआधी कोणतीही स्पर्धा मी दहावेळा जिंकलेलो नाही. त्यामुळेच ही स्पर्धा माझ्या कायम स्मरणात राहील.
- रॉजर फेडरर