पॅरिस : टेनिस विश्वात पुनरागमन करणाऱ्या सेरेना विल्यम्सवर काही जणं प्रश्न उपस्थित करत आहेत. हे प्रश्न तिच्या खेळावर उपस्थित होत नसून तिने परीधान केलेल्या ड्रेसवर उठत आहेत. कारण सध्या सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेनाने ' ब्लॅक पँथर ' हा ड्रेस परीधान केला होता. हा ड्रेस परीधान करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे, असे काही जणांचे मत आहे. पण सेरेनाने मात्र आपण ' ब्लॅक पँथर ' ड्रेसमध्ये खेळणार असल्याचा निर्धार केला आहे.
सेरेना आई झाल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत पुनरागमन करत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सेरेनाने झेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना प्लिस्कोवावर 7-6, 6-4 असा विजय मिळवला होता. सेरेनाचा 2017 सालानंतरचा हा पहिला विजय होता. या सामन्यानंतर सेरेनाच्या ' ब्लॅक पँथर ' या ड्रेसबाबत प्लिस्कोवासहीत काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत.
याबाबत सेरेना म्हणाली की, " ' ब्लॅक पँथर ' हा ड्रेस परीधान करण्यात वावगे असे काही नाही. यामध्ये कुठलाही अश्लिलपणा नाही. हा ड्रेस परीधान केल्यावर मला सुपर हिरो झाल्यासारखे वाटते. त्यामुळे यापुढेही मी ' ब्लॅक पँथर ' हा ड्रेस परीधान करणार आहे. "