मॅरेथॉन सामन्यात वॉवरिंकाची सरशी; फ्रेंच ओपनमधील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:02 PM2019-06-03T15:02:19+5:302019-06-03T15:11:24+5:30
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना रविवारी खेळला गेला.
- ललित झांबरे
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना रविवारी खेळला गेला. त्यात माजी विजेता स्वित्झर्लंडचा स्टान वॉवरिंकाने ग्रीसच्या स्टेफानोस सीसीपासवर 7-6(6), 5-7, 6-4, 3-6, 8-6 असा विजय मिळवला, मात्र या विजयासाठी त्याला तब्बल पाच तास 9 मिनीटे संघर्ष करावा लागला.
पुरुषांच्या व्यावसायिक टेनिसमधील पाच तासापेक्षा अधिक काळ खेळ झालेला हा 47 वा सामना ठरला तर फ्रेंच ओपनच्या इतिहासातील चौथा सर्वात प्रदीर्घ सामना ठरला. वावरिंका हा कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच तासाच्यावर रंगलेला सामना खेळला. यापूर्वी 2013 च्या ऑस्ट्रेलियन ओपन चौथ्या फेरीत तो नोव्हाक जोकोवीचकडून पाच तास 2 मिनिटांच्या संघर्षानंतर पराभूत झाला होता. सीसीपास मात्र त्याच्या कारकिर्दीत प्रथमच पाच तासांच्यावरचा सामना खेळला.
टेनिसमध्ये सर्वांत प्रदीर्घ सामन्याचा विक्रम 11 तास 5 मिनिटांचा आहे. विम्बल्डन 2010 च्या पहिल्या फेरीच्या या सामन्यात तब्बल तीन दिवस खेळ चालला आणि त्यात अमेरिकेच्या जॉन इस्नर याने फ्रान्सच्या निकोलस माहुत याला 6-4, 3-6, 6-7, 7-6, 70-68 अशी मात दिली होती.
फ्रेंच ओपनमधील प्रदीर्घ सामने
1) 6 तास 33 मिनिटे- 2004- पहिली फेरी फॅब्रिस सांतारो वि.वि. अर्नाड क्लेमेंट 6-4, 6-3, 6-7, 3-6, 16-14
2) 5 तास 41 मिनिटे- 2012- दुसरी फेरी पॉल हेन्री मॅथ्यू वि.वि. जॉन इसनर 6-7, 6-4, 6-4, 3-6, 18-16
3) 5 तास 31 मिनिटे- 1998- तिसरी फेरी अॅलेक्स कॉरेत्जा वि. हर्नन गुमी 6-1, 5-7, 6-7, 7-5, 9-7
4) 5 तास 9 मिनिटे- 2019- चौथी फेरी स्टान वॉवरिंका वि.वि. स्टेफानोस सीसीपास 7-6(6), 5-7, 6-4, 3-6, 8-6