प्राची सोनवणेनवी मुंबई : साडेतीन वर्षांची असल्यापासून ती टेबल टेनिसचे धडे गिरवित आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली आंतरराष्ट्रीय टेनिसपटू होण्याचा मान तिने मिळवला आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने कर्तृत्त्वाचा झेंडा रोवला आहे. सध्या २०२०मध्ये होणाºया आॅलिम्पिकसाठी ती कसून मेहनत घेत आहे. देशाचे नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी धडपडणारी खारघरमधील स्वस्तिका संदीप घोष (१७) क्रीडा क्षेत्रातील नवरागिणी ठरली आहे.स्वस्तिका खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. साउथ एशियन कन्ट्रीज टेबल टेनिस चॅम्पिअनशीपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत तिने सुवर्ण पदक पटकावले. २०१५-२०१६ या दोन्ही वर्षी कोलकाता आणि सिलिगुरी येथे झालेल्या स्पर्धेत जेतेपद मिळवले.मे २०१७मध्ये श्रीलंका येथे होणाºया साउथ एशियन फेडरेशनच्या वतीने आयोजित टेबल टेनिस चॅम्पिअनशीपकरिता स्वस्तिकाची निवड झाली. यामध्ये तिने सुवर्णपदक मिळवून देशाचे वर्चस्व कायम ठेवले. स्वस्तिका घोष हिने राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ज्युनिअर मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकाविले. अभ्यास आणि सरावाचा ताळमेळ ठेवताना शाळेतील शिक्षकांकडून वेळोवेळी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्याचे स्वस्तिका सांगते.वयाच्या पाचव्या वर्षी पनवेल येथे झालेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका विजयी ठरली. आयटीटीएफ वर्ल्ड सर्किट चायनीज तैपई ही खुली स्पर्धा तैवान येथे झाली होती. त्यामध्ये स्वस्तिका घोष हिने जर्मनीच्या फ्रांजिस्का सोबत मलेशियाला पराभूत करून उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश मिळविला. इंदोर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या लीऊ वी विचा पराभव करून रजत पदकावर नाव कोरले.>वडिलांकडून प्रेरणा : स्वस्तिकाच्या यशामध्ये तिच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. तिला टेबल टेनिसचे धडे देणारे प्रशिक्षक खुद्द तिचे वडील असून, त्यांच्याकडूनच तिने खेळाची प्रेरणा घेतली. २० वर्षांहून अधिक काळ संदीप घोष हे टेबल टेनिस प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वस्तिकाने एक वेगळी ओळख तयार करावी, अशी आशा असून ती लवकरच पूर्णत्वास येईल, असा विश्वास संदीप घोष यांनी व्यक्त केला.
स्वस्तिकाचे मिशन आॅलिम्पिक, रायगडमधील पहिली आंतरराष्ट्रीय टेनिसपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 2:47 AM