ललित झांबरे - अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा) चे अंतराळवीर कमांडर अँड्र्यू फेस्टेल आणि सहकाऱ्यांचा अंतराळात टेनिस खेळण्याचा प्रयोग मंगळवारी (अमेरिकन वेळेनुसार) यशस्वी झाला. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) त्यांनी हा इतिहास घडवला. भूतलापासून सुमारे अडीचशे मैल उंचीवरच्या या सामन्याचे यूएस टेनिस असो. च्या नेटजेनरेशन या ऑनलाईन चॅनेलने आणि आर्थर स्टेडियमजवळच्या युनीस्फिअरवर प्रक्षेपण करण्यात आले.
टेनिसची दुनिया कशी सीमापार पोहाचून ताऱ्यांच्या विश्वात पोहचू शकते हे दाखविण्यासाठी हा प्रयोग होता. त्यासाठी आयएसएसवर तात्पुरते टेनिस कोर्ट तयार करण्यात आले होते आणि गुरुत्वाकर्षणाच्या अभावात काम करणारी खेळाची साधने पोहचविण्यात आली होती. त्यात छोट्या रॅकेट, पिवळे नेट आणि फोमच्या चेंडूंचा समावेश होता. या ऐतिहासिक प्रयोगासाठी खेळाच्या नियमांतही बदल करण्यात आला होता. त्यात तरंगणारे चेंडू आयएसएसचे तळ, छत आणि नेटखालून मारण्याची मूभा होती.
आजचा दिवस हा ध्येयपूर्तीचा होता. टेनिसच्या प्रचार आणि प्रसारासाठी यूएस टेनिस असो.चा हा प्रयत्न होता, असे यूएसटीएचे सीईओ गॉर्डन स्मीथ यांनी म्हटले आहे.
अंतराळातील या पहिल्या टेनिस सामन्यासाठी नासाच्या मोहिम 56 चे कमांडर फेस्टेल यांना आघाडीचा टेनिसपटू युआन मार्टिन डेल पौत्रोने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे टीप्स दिल्या होत्या. टेनिसच नव्हे तर क्रीडा जगतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या प्रयोगाचे 'वन स्मॉल एस फॉर मॅन, वन जायन्ट लीप फॉर टेनिस' असे वर्णन करण्यात येत आहे.