टेनिस क्रमवारी : रॉजर फेडररचे अव्वल स्थान खालसा, राफेल नदाल ठरला नंबर वन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 07:33 PM2018-03-25T19:33:29+5:302018-03-25T19:33:29+5:30
अव्वल मानांकित फेडररला यावेळी जागतिक क्रमवारीत 175व्या स्थानावर असलेल्या थानासी कोकिनाकीसने पराभूत केले.
मियामी : आतापर्यंत तब्बल 20 वेळा ग्रँडस्लॅम पटकावलेल्या रॉजर फेडररचे अव्वल स्थान खालसा झाले आहे. मियामी टेनिस स्पर्धेत फेडररला अनपेक्षित धक्का बसला. यामुळे त्याला जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. स्पेनचा डावखुरा टेनिसपटू राफेल नदाल आता क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
फेडरर बऱ्याच दिवसांनी चांगला रंगात आला होता. पण मियामी स्पर्धेत त्याला असा धक्कादायक पराबव स्वीकारावा लागेल, असे कुणाच्या गावीही नव्हते. कारण अव्वल मानांकित फेडररला यावेळी जागतिक क्रमवारीत 175व्या स्थानावर असलेल्या थानासी कोकिनाकीसने पराभूत केले आणि टेनिस विश्वाला आश्चर्य वाटले. ऑस्ट्रेलियाच्या थानासीने फेडररला यावेळी 3-6, 6-3, 7-6 (7/4) असे पराभूत केले.
पहिला सेट जिंकल्यावर फेडरर हा सामना सहज जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण थानासीने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि हा सेट 6-3 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर झालेला तिसरा सेट चांगलाच रंगला. दोन्ही खेळाडू 6-6 अशा बरोबरीत होते. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या टायब्रेकरमध्ये थानासीने 7-4 अशी बाजी मारली आणि सेटसह सामनाही जिंकला.
या विजयानंतर थानासी म्हणाला की, " काही वेळा फेडररबरोबर सराव करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टमध्ये कसे उभे राहायचे, हे दडपण मला नव्हता. मी माझे खेळ कसा चांगला होईल आणि चुका कशा टाळल्या जातील, यावर मी जास्त भर दिला. "
या पराभवाने निराश झालो असून खेळात मला अजून काही सुधारणार कराव्या लागतील, अशी प्रतिक्रीया यावेळी फेडररने दिली आहे.