वुहान : येथे सुरु असलेल्या डब्ल्यूटीए वुहान ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. चीनच्या शुआई पेंगसह खेळत असलेल्या सानियाचा युंग जॅन चॅन - मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीविरुध्द पराभव झाला.चुरशीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात चॅन - हिंगीस या अव्वल मानांकीत जोडीने सानिया - पेंग यांचा ७-६(५), ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये पाडाव केला. एकेकाळी हिंगीससह खेळताना सानियाने महिला दुहेरी टेनिसविश्वावर वर्चस्व गाजवले होते. मात्र, त्याच हिंगीसविरुध्द खेळताना सानियाचा खेळ बहरला नाही. १ तास ४८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सानिया - पेंग यांनी चांगली झुंज दिली. टायब्रेकमध्ये एकवेळ सानिया - पेंग बाजी मारणार असेच चित्र होते. मात्र, हिंगीसने आपला सर्व अनुभव पणास लावताना सर्व सूत्रे आपल्याकडे घेत पहिला सेट जिंकण्यात मोलाचे योगदान दिले.दुस-या सेटमध्ये सानिया - पेंग पुनरागमन करतील अशी आशा होती. त्यांनी तसा खेळही केला. मोक्याच्यावेळी ब्रेक पॉइंट गमावल्याचा फटका इंडो-चायना जोडीला बसला आणि त्यांना उपांत्य फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. (वृत्तसंस्था)
वुहान ओपन : सानिया-पेंग यांचे आव्हान संपुष्टात, उपांत्य फेरीत चॅन - हिंगीस यांनी नमविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:12 AM