ठाण्यात १०० कोटींच्या रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:44 AM2021-09-26T04:44:19+5:302021-09-26T04:44:19+5:30
ठाणे : वारंवार पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून शहरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ठाणेकरांकडून तीव्र संताप ...
ठाणे : वारंवार पडणाऱ्या पावसामुळे खड्डे पडून शहरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ठाणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहराच्या विविध मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर शेकडो खड्डे असूनही महापालिकेने सध्या अवघे ११२ खड्डे असल्याचा दावा केला आहे. तर प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गेल्या वर्षी स्थानिकांना डावलून दिल्लीतील ज्या ठेकेदारास १०० कोटींची कामे कमी दराने दिली होती, त्याच रस्त्यांना आता खड्डे पडले असून, सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील म्हणून त्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याची चर्चा आहे.
दरवर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र तरीसुद्धा जुन्या व नव्या रस्त्यांचीदेखील यंदाच्या पावसात चाळण झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात दोन हजार ८३६ खड्डे असून, त्यातील दोन हजार ७२४ खड्डे भरले आहेत. तर आजही ११२ खड्डे बुजविणे शिल्लक आहे.
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या जोडीने शहरातील वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात आजघडीला २१ लाख ३८ हजार ६७ वाहने आहेत. परंतु, काही रस्त्यांचे रुंदीकरण झाले तर काहींची नव्याने बांधणी केली आहे. त्यानुसार शहरातील एकूण रस्त्यांची लांबी जी पूर्वी ३५६ किमी होती, त्यात २०१८-१९ मध्ये वाढ होऊन ती ३७० किमी एवढी झाली आहे. शहरात एकूण १४ प्रमुख रस्ते आहेत. त्यांचे क्षेत्रफळ ३०.७६ हेक्टर एवढे आहे. शहरात डांबरी रस्ते २१२.४९ किमीचे तर सिमेंट रस्ते १४६.९९ किमीचे आहेत. यातील काही रस्ते नव्याने विकसित केले आहेत.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खड्ड्यांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी नव्या पद्धतीने रस्ते विकसित करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार या रस्त्यांची कामे झाली जरी असली तरी त्या रस्त्यांवरही आता खड्डेच खड्डे असे चित्र आहे. शहरातील घोडबंदर, तीनहातनाका, नितीन कंपनी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, घोडबंदर सेवा रस्ता, माजिवडा, कापुरबावडी, कॅसल मिल तसेच येथील उड्डाणपूल या सर्वांवरच तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत.
यंदा खड्डे बुजविण्यासाठी अडीच कोटींचा खर्च महापालिकेने केला आहे. परंतु, या खड्ड्यांना तात्पुरता मुलामा लावला जात असल्याने या रस्त्यांची चाळण होत आहे. रस्ते तयार करण्यासाठी ज्या ज्या ठेकेदारांना ही कामे दिली होती त्यांच्याकडून ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे आता उघड झाले आहे. परंतु, त्यांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी महापालिका पुन्हा पुन्हा त्यांनाच रस्त्यांची कामे देत आहे. त्यातही एखादा रस्ता तयार करायचा झाला तर त्या रस्त्याच्या ठिकाणी किती लेयर असणे आवश्यक आहे, डांबर कशा प्रकारे वापरले गेले पाहिजे, त्याचे निकष - नियम काय आहेत यालाही कोलदांडा दाखवून ठेकेदारांकडून काम मिळविण्यासाठी आणि टक्केवारी देण्यासाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते केले जात आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडू नयेत म्हणून महापालिकेकडून यू टी डब्ल्यू टी अत्याधुनिक काँक्रिट यासह विविध प्रयोग करण्यात येत आहेत. मात्र, तरीही रस्त्यांची चाळण होत आहे.
रस्ते उभारणीत कामचुकारपणा किंवा ढिलाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ठामपा आयुक्तांकडून देण्यात येते. परंतु, कोणावरही कारवाई केली जात नाही. याचेही आश्चर्य वाटत आहे.
......