संवादासाठी १३ दिवस..! प्रशांत माने ल्ल कल्याण
By admin | Published: October 17, 2015 01:46 AM2015-10-17T01:46:14+5:302015-10-17T01:46:14+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी १७ आॅक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी १७ आॅक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. मतदान १ नोव्हेंबरला होणार असल्याने ४८ तास आधीच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यामुळे मतदारांशी संवाद साधण्यासाठी अवघे १३ दिवसच उपलब्ध असल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दिवसांत चौकसभा, प्रचारसभा, घरोघरी जाऊन प्रचार अशा विविध पातळ्यांवर उमेदवारांचा कस लागणार आहे.
केडीएमसीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप हे पक्ष समोरासमोर उभे ठाकले असून काँगेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आघाडी करून लढत आहेत. मनसेसह एमआयएम, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन विकास आघाडी, कम्युनिस्ट पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. रिपब्लिकन पक्षाने भाजपासोबत युती केली आहे. भाजपाने रिपाइंला १२ जागा सोडल्या आहेत. या निवडणुकीत हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननी प्रक्रियेत ४७ अर्ज बाद ठरल्याने ९७८ उमेदवार रिंगणात राहिले. यातील काही उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतल्याने उमेदवारांच्या संख्येत घट झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याने यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने आरोप-प्रत्यारोपाने कल्याण-डोंबिवली तसेच ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघणार आहे. नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे निवडणूक प्रचारादरम्यान येथेच असणार आहेत. शहरात ते चार सभा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्याही प्रचारसभा होणार आहेत.
आघाडीच्या नेत्यांच्या सभांनीही एकंदरीतच या १३ दिवसांत राजकीय वातावरण पुरते तापणार आहे. नेत्यांच्या प्रचारसभा होणार असल्या तरी छोट्या-मोठ्या चौकसभा आणि घरोघरी जाऊन प्रत्यक्षपणे मतदारांशी संवाद तसेच प्रचारासाठी अप्रत्यक्षपणे सोशल मीडियाचा होत असलेला वापर यावर उमेदवारांच्या प्रचाराचा भर असणार आहे. प्रभागात प्रचाराचे होर्डिंग्ज लावण्यालादेखील मर्यादा घातल्या आहेत. त्यात, फारच कमी दिवस प्रचारास मिळणार असल्याने उमेदवारांची चांगलीच धांदल उडणार आहे.