दहा दिवसांत १३ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:40+5:302021-05-05T05:06:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी घेतलेल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम ठाण्यात झाल्याचे दिसून आले आहे. मागील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी घेतलेल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम ठाण्यात झाल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी हात असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. यात गेल्या १० दिवसांत ठाण्यात आठ हजार ३३१ नवे कोरोना रुग्ण आढळले असले तरी याच कालावधीत तब्बल १३ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, १० दिवसांत १०४ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. ठाणे महापालिकेने उचलेल्या पावलांमुळे रुग्णसंख्या घटत असून, रुग्ण बरे होण्याचा टक्का हा ९२ टक्क्यांवर गेला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत फेब्रुवारी मध्यापर्यंत कोरोना आटोक्यात असल्याचे दिसत होते. परंतु, फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने ठाणेकरांच्या चिंतेच भर पडली आहे. त्यानुसार मार्चच्या एका महिन्यात शहरात १४ हजार ७४७ नव्या रुग्णांची भर पडली, तर एप्रिल महिन्यात ४१ हजार २५ नवे रुग्ण आढळले. परंतु, याच कालावधीत ३९ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मातदेखील केल्याचे दिसून आले. तर लॉकडाऊनच्या आधीपर्यंत रोजच्या रोज ठाण्यात पंधराशे ते अठराशे नवे रुग्ण आढळत होते. परंतु, सध्या हाच आकडा ५०० ते ७०० च्या घरात स्थिरावल्याचे दिसत आहे. ठाणेकरांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिल्यानेच खऱ्या अर्थाने ते कोरोनावर मात करू लागले आहेत.
आतापर्यंत एक लाख २० हजार ९२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात एक लाख ११ हजार ६१ जण कोरानामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८२ टक्क्यांपर्यंत होते. त्यात आता १० टक्यांची वाढ झाला आहे. सध्या ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९२ टक्क्यांवर गेला आहे. सध्याच्या घडीला आठ हजार १४८ रुग्ण हे प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.
सध्याच्या नव्या ट्रेंडनुसार घरातील एकाला बाधा झाली तर इतरांना बाधा होत आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढत होते. परंतु, पालिकेने यावरदेखील अंकुश मिळविला आहे. सध्या प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पाच हजार ५१० रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. तर दोन हजार ३१९ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील पाच हजार ८२९ रुग्णांत कोणतेही लक्षणे नाहीत. तर एक हजार ७५५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. याशिवाय ६४ रुग्ण हे क्रिटिकल असून, ३८२ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर १८२ जणांना व्हेंटिलेटर्स लावले आहेत. दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी हा महिनाभरापूर्वी ५५ दिवसांवर होता. तो आता १२७ दिवसांवर आला आहे.
मागील १० दिवसांचा विचार केल्यास शहरात नव्या रुग्णांची संख्या घटत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. या काळात आठ हजार ३३१ नवे रुग्ण आढळले असून, १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच कालावधीत १३ हजार ९७१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
नवे रुग्ण - मृत्यू- बरे झालेले रुग्ण
११०८ - ८ - १६७५
१०५४ - १० -१४९५
६९८ - ८ - १३५०
७७० - ११ - १४५८
९७१ - १५ - १५८२
८६३ - १३ - १३०७
८६३ - १३ - १२८३
७३२ - ९ - १२५५
७५६ - ८ - १४४५
५१६ - ९ -११२१
---------------------
८३३१ - १०४ - १३९७१