१४ कोटींचा निधी परत; नाट्यगृह, प्रशासकीय इमारत रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:47 AM2018-01-20T01:47:33+5:302018-01-20T01:47:36+5:30
बदलापूर नगरपालिका प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी २०१५ मध्ये सरकारने १४ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला होता.
बदलापूर : बदलापूर नगरपालिका प्रशासकीय इमारत आणि नाट्यगृहासाठी २०१५ मध्ये सरकारने १४ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र तीन वर्षात हा निधी संबंधित प्रकल्पासाठी वापरला न गेल्याने तो पुन्हा सरकारकडे जमा झाला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा फटका बसला आहे.
नाट्यगृहासाठी जागाच मिळत नसल्याने प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. मात्र प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जागाच नसल्याने हा निधी वापरलाच गेला नाही. अशीच काहीशी परिस्थिती प्रशासकीय इमारतीबाबत होती. इमारतीच्या जागेचा वाद असल्याने त्या जागेवर इमारत उभारता आलेली नाही. इमारत उभी न राहिल्याने तो निधीही परत जाण्याच्या मार्गावर होता. मात्र इमारतीच्या जागेचा वाद सुटल्यावर पालिकेने इमारत उभारण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र हाच पाठपुरावा सुरु असताना अधिकाºयांच्या लक्षात आले की निधी सरकारकडे परत गेला आहे. मात्र त्याची कोणतीही माहिती प्रशासन आणि अधिकाºयांना नव्हती.
नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत स्थानकाजवळच्या जागेत प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. १४.१४ कोटीपैकी ७ कोटी इमारतीसाठी वापरता येईल. तसेच नगरपालिकेकडेही ५ कोटी शिल्लक आहेत त्याचा वापर करता येईल असे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सभेत स्पष्ट केले. प्रत्यक्षात निधी वापराविना पडून राहिल्याने तो परत गेला. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होता. मात्र त्याचा वापर दोन वर्ष न झाल्याने तो परत गेला. हा निधी परत मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.