ठाणे : भारतीय कुटुंबव्यवस्थेतील संवेदना, संस्कार पती-पत्नीच्या नात्यातील अहंकारमुळे हरवले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी २००५ साली कौटुंबिक हिंसाचार कायदा आला. त्याची अंमलबजावणीला सुरू होताच दहा वर्षात २६ ते ४० वयोगटांतील सुमारे १४ लाख नऊ हजार मुलांनी केवळ पोटगीच्या नुकसानभरपाईपोटी आत्महत्या केल्या आहेत, तर तीन लाख ४० हजार घटस्फोटासाठीचे अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी माहिती अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी दिली.सारा फाऊंडेशनच्या चौथ्या वर्धापनिदनानिमित्त सहयोग मंदिर येथे ‘चला नाते जपू या’ या कार्यक्र मात त्या बोलात होत्या. महिलांवर अन्याय होतो, म्हणून कौटुंबिक हिंसाचार कायदा अस्तित्वात आला. पण यामुळे भारतीय कुटुंबसंस्था खिळखिळी होत असल्याचे चित्र दिसत आहे. विवाहानंतर केवळ चार दिवसांतच सासू, पती शारीरिक, मानसिक छळ करतात म्हणून मुली कोर्टात घटस्फोटाचे दावे दाखल करतात आणि याचा गैरफायदा घेत गल्लाभरू वकील मुलांना तीस ते चाळीस पानी नाेिटसा पाठवून त्यांचे जीणे नकोसे करून टाकतात. २० लाख, ५० लाख, एक कोटी नुकसानभरपाईची मागणी मुलीकडचे करतात. दुर्देवाने ही मागणी मुलाला पूर्ण करणे शक्य नसेल, तर त्याच्यापुढे आत्महत्त्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, अशी उदाहरणे त्यांनी दिली. देशात १४ लाख मुलांना नुकसानभरपाई देणे शक्य झाले नाही म्हणून अशा २६ ते ४० या वयोगटातील मुलांनी आत्महत्त्या केल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या आईने त्याचे लग्न होताच संसाराच्या चाव्या सुनेकडे सोपवल्या तरच मुलांचा संसार आणि पर्यायाने घर आनंदात राहील, असा सल्लाही त्यांनी दिला. हल्ली जावई सांभाळणे सोपे, पण सून सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. कारण सासूचे हात कायद्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे सासूनेही बदलत्या काळानुसार तडजोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील,डॉ. रोहित गोखले, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, माटे अँण्ड सन्सचे माटे, वास्तूविराज मंजुषा अहिरराव यांना गौरविण्यात आले. सारा फाऊंडेशनच्या सारंगी महाजन उपस्थित होत्या.
१४ लाख तरुणांच्या आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचारावर ठेवले बोट; भरपाई देणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:29 AM