परिवहनच्या १२ जागासांठी १५ उमेदवार
By admin | Published: April 13, 2016 01:44 AM2016-04-13T01:44:13+5:302016-04-13T01:44:13+5:30
ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे.
ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या १२ सदस्यांच्या निवडीकरिता १५ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ आहे. शुक्रवार २२ एप्रिल रोजी कोण सदस्यपदी निवडून जातो ते स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात ठेवल्याने आणि मनसे व रिपाइं यांच्यापैकी कुणाच्या उमेदवाराने माघार घ्यायची, याचा तिढा न सुटल्याने होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही परिवहनच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ काँग्रेसच्या एका सदस्याने आपला अर्ज मागे घेतला तर एक अर्ज सोमवारी छाननीत बाद झाला.
ठाणे परिवहन समितीवर १२ सदस्यांच्या निवडीकरिता १७ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युनिस शेख यांचा अर्ज छाननीत बाद झाला असून काँग्रेसचे शैलेश शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता १२ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनकडून पवन कदम, साजन कासाय, अनिल भोर, प्रकाश पायरे, राजू महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव, नरेश देसाई आणि संजय भोसले यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून सचिन शिंदे यांचा एकमेव अर्ज आता शिल्लक आहे.
तर राष्ट्रवादीकडून सुरेंद्र उपाध्ये, हेमंत धनावडे, तकी चेऊलकर, सुधाकर नाईक या चार जणांचे अर्ज दाखल आहेत. मनसे कडून राजेश मोरे आणि रिपाइंकडून उत्तम खडसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे केवळ तीन सदस्य समितीवर जाणार असतानाही त्यांचे चार उमेदवार रिंगणात आहेत.
मनसे अथवा रिपाइंचा प्रत्येकी एक सदस्य समितीवर निवडून जाणार आहे. परंतु मनसे अथवा रिपाइंच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीपुढील चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीकडून तकी चेऊलकर, हेमंत धनावडे आणि सुरेंद्र उपाध्यय यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आमदार जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि माजी मंत्री गणेश नाईक गटातील तिघांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर नाईक यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरणार आहे. (प्रतिनिधी)
संख्याबळानुसार सेनेचे सर्वाधिक सात सदस्य तर राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचा एक सदस्य निवडून जावू शकतो. दरम्यान मनसे आणि रिपाइं एकतावादी हे ठामपातील लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असल्याने यातील एकाला राष्ट्रवादीने पाठिंबा देणे अपेक्षित होते.
दोन अतिरिक्त उमेदवार रिंगणात राहिल्याने कोणाच्या पारड्यात किती मते पडणार यावरुनच परिवहनचे दार कोणाला उघडणार याचे गणित ठरणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजाराला ऊत येणार असून, त्यास सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व रिपाइं हे पक्ष जबाबदार आहेत.