ठाणे : शहापूर तालुक्यातील २७ गांवांना रस्तेच नसल्याचे लोकमतने वेळोवेळी उघड केले. त्यास अनुसरून श्रमजीवी संघटनेने आंदोलने छेडून प्रशासनाला जागे केले. वन विभागाला जाणीव करून देते सविस्तर प्रस्ताव सादर केले. त्यांची दखल घेऊन वनविभागाने १५ रस्त्यांसाठी जागा मंजूर करुन या गावांच्या रस्तांचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश खोडका यांनी लोकमतला सांगितले.रस्ते नसलेल्या या गावातील रहिवाशांना, रुग्ण, गरोदर माताना रुग्णालय गाठण्यापूर्वी जीव गमवावे लागले. शाळकरी मुलांना नदी, नाल्याच्या पुरातून मार्ग काढत शाळा गाठावी लागली. त्यांच्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक संघटना व लोकमतने एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाचे, वनविभागाचे लक्ष वेधून घेत लोकप्रतिनिधींना जाणीव करून दिली. वनविभागाने २७ पैकी १५ गांवाच्या प्रस्तावावर लक्ष केंद्रीत करत रस्त्यांसाठी जागा मंजूर करुन या गांवाना रस्त्याने जोडण्यासाठी सहमती दिली आहे.या रस्याच्या जागेचा लाभ झालेल्यांमध्ये वेहलोंडे, बोरशेती-कळंबे, तळीचापाडा यांचा समावेश आहे, तर कुटेपाडा, जाधव पाडा, कातकरीवाडी,खुटघर,नडगांव,कोठारे, अजनूप,दळखण,टेंभा,वेहळोली,वेळुकचा पटकीपाडा, तरीचा पाडा आदी गांवे व त्यांच्या पिढ्यांसाठी रस्यांची जागा वनविभागाने मंजूर केल्यामुळे गांवकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. उर्वरित गांवाच्या रस्ताचे प्रस्तावावर प्रशासन कारवाई करीत आहे. तर काही प्रस्ताव गहाळ झाल्यामुळे नव्यानं पाठवण्याच्या सुचना वनविभागाने जारी केल्याचे खोडका यांनी सांगितले.