१५० जणांवर चौकशीचा फास

By admin | Published: April 15, 2016 01:31 AM2016-04-15T01:31:09+5:302016-04-15T01:31:09+5:30

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या चारही नगरसेवकांच्या बँक खात्यांतून ज्या १५० जणांना मोठ्या रकमा दिल्या गेल्या आहेत

150 fugitives of inquiry | १५० जणांवर चौकशीचा फास

१५० जणांवर चौकशीचा फास

Next

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या चारही नगरसेवकांच्या बँक खात्यांतून ज्या १५० जणांना मोठ्या रकमा दिल्या गेल्या आहेत, त्या सर्वांची चौकशी होणार आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या काळात ठाण्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
निवडून येण्याची क्षमता असलेल्यांवर चौकशीच्या आडून दबाव आणून ठाणे पालिका निवडणुकीत पक्षांतरासाठी प्रयत्न करण्याचा ‘कल्याण-डोंबिवली पॅटर्न’ या काळातही राबवला जाईल, अशी चर्चा विरोधकांत दबक्या आवाजात सुरू आहे.
बिल्डर परमार यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या डायरीमुळे ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांना कारागृहात जावे लावले. आरोपपत्रानंतर आता चारही नगरसेवक जामिनावर सुटले आहेत. या प्रकरणाच्या तपासाचे, मालमत्तेचे स्रोत शोधण्याचे, रकमा कोणाकोणाला हस्तांतरित करण्यात आल्या, त्याचा माग काढण्याचे आणि प्राप्तिकर विभागाच्या छाप्यातील डायरीमधील सांकेतिक नावांचा शोध घेण्याचे काम विशेष शोधपथक (एसआयटी) करीत आहे. या चारही नगरसेवकांनी त्यांचा मित्र परिवार, निकटवर्ती, काही व्यावसायिक हितसंबंध असलेल्यांना मोठमोठ्या रकमा दिल्या आहेत. त्यांच्या बँक नोंदीच्या आधारे साधारण १५० जणांची चौैकशी होणार असून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे.
एकंदरीतच या चारही नगरसेवकांशी भक्कम आर्थिक संबंध असलेले राजकीय नेते, त्यांचे आर्थिक पुरवठादार यांच्याभोवती लवकरच चौकशीचा फास आवळला जाण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर ऐन निवडणुकीच्या तेजीच्या काळात ठाण्यातील विविध पक्षांतील अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या मित्र परिवारातील व्यक्तींना चौकशीच्या टांगत्या तलवारीखाली वावरावे लागण्याची शक्यता आहे.
पोलिसांमार्फत चौकशीचा ससेमिरा टाळायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातून बाहेर पडावे, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याची रणनीतीही राबवली जात असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गेल्या महिन्यातील ठाणे दौऱ्याचा, जाताजाता त्यांनी पालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चहापानाचा संदर्भ दिला जात आहे.

ठाण्यातही फोडाफोडी फॉर्म्युला
विधानसभा, कल्याण-डोंबिवलीसह इतर महापालिका निवडणुकांत भाजपाने ज्या प्रकारे इतर पक्षांतील निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार आपल्या पक्षात घेऊन आपली संख्या वाढवली, त्याचीच पुनरावृत्ती ठाण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
सध्याच्या सात नगरसेवकांची संख्या भाजपाला ७७ करायची असल्याने फोडाफोडी होणार, हे गृहीत धरले जात आहे. त्यासाठी चौकशीचा ससेमिरा लावला जाईल, असा आरोप विरोधकांनी आधीच केला होता आणि भाजपा नेत्यांनी तो फेटाळलाही होता.

कल्याण-डोंबिवलीचा कित्ता गिरवणार?
वेगवेगळ्या जुन्या गुन्ह्यांच्या फायली उघडून आणि चौकशीचा फेरा मागे लागेल, असे धमकावून पक्षांतरासाठी दबाव येत असल्याचा आरोप कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीवेळी भाजपावर झाला होता.
त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याचा वापर केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिल्याने त्या निवडणुकीला नाट्यमय वळण लागले होते. त्याचाच कित्ता ठाण्यात परमार प्रकरणातून गिरवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ते १५० जण कोण, याचा अंदाज घेऊनच अनेक जण धास्तावले आहेत.

Web Title: 150 fugitives of inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.