ठाणे : ठाणे परिवहन सेवेत टप्याटप्याने इलेक्ट्रीक बस दाखल होत आहे. सद्यस्थितीत २३ बस असतांना आता त्यात आणखी नवीन १६ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. गणेश चतुथीर्पूर्वी ९ मीटर लांबीच्या १६ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. या बस शहरातील अंतर्गत भागासह दिवा परिसरात चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली.
येत्या वर्षभरात टिएमटीच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रिक बस टप्पाटप्याने दाखल होणार आहेत. यातील दोन बारा मीटरच्या इलेक्ट्रिक बस सध्या ठाण्याच्या रस्त्यावर धावतायेत. तर नुकत्याच दाखल झालेल्या बारा मीटरच्या आणखीन दहा बसचे उदघाटन करून त्या येत्या ११ सप्टेंबरपासून सुरु होतील. या बस प्रामुख्याने घोडबंदर मार्गांवर चालविल्या जाणार आहेत. महत्वाची बाब ठाणे शहरातील अंतर्गत मार्ग हे अरुंद असल्याने तिथे बारा मीटरच्या बस जाण्यासाठी अडचण निर्माण होते. ही समस्या लक्षात घेता याठिकाणी मिनी बस चालवीण्याचा पर्याय पुढे आणण्यात आला. त्यानुसार ९ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील कोकणीपाडा, मनोरमा नगर, बोरिवडे, आदी मार्गांवर मोठ्या बसला वळण घ्यायला अडचणी येत होत्या. या मार्गांवर या ९ मीटरच्या बसेस प्रवाशांना योग्य पर्याय ठरू शकतील. येत्या काही दिवसात ठाणे परिवहन सेवेत १६ नवीन ९ मीटरच्या इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यातील काही बस या मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा भागात ही टीएमटी च्या अधिकच्या बसची मागणी केली होती. त्यानुसार यातील काही बस दिवा परिसरातील प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बस साधारण गणेशउत्सवाच्या पूर्वी टिएमटीच्या ताफ्यात दाखल होतील. त्याच्या विविध शासकीय परवानग्या मंजूर झाल्यानंतर गणेशउत्सवाच्या काळातच या बसचे उद्घाटन करण्याचा परिवहन सेवेचा मानस आहे.