उज्ज्वला गॅस योजनेपासून 16 हजार महिला वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 01:09 AM2020-11-20T01:09:37+5:302020-11-20T01:09:44+5:30
सरकारविरोधात संताप : लक्ष्यांंकयादीची प्रतीक्षा करण्याचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केंद्र शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेद्वारे जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना एलपीजी गॅसची जोडणी (कनेक्शन) मोफत दिले जात आहे. याशिवाय, स्वयंपाकासाठी शेगडीही दिली जात आहे. मात्र, या ६० हजार २८३ लाभार्थी महिलांपैकी ४४ हजार १५२ लाभार्थ्यांचा जिल्ह्यातील लक्ष्यांंक गेल्या वर्षीच पूर्ण झाला आहे. आता जिल्ह्यात ही योजना तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे या लाभापासून वंचित असलेल्या १६ हजारांंवर महिलावर्गात राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या या उज्ज्वला गॅस योजनेचा जिल्ह्यात ६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता. त्यापैकी तब्बल ४४ हजार १५२ महिलांना या गॅस कनेक्शनसह त्याच्याशी संबंधित साहित्याचा लाभ मोफत देण्यात आला आहे. मात्र, हा लक्ष्यांंक गेल्याच वर्षी पूर्ण झाल्यामुळे या लाभाची अपेक्षा असलेल्या आदिवासी व मागासवर्गीय महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे तर रेशनिंग दुकानदार व महिलांमध्ये शाब्दिक चकमकीही ऐकायला मिळत आहेत. त्यांची ही नाराजी काही अंशी दूर करण्यासाठी पुढील लाभार्थी लक्ष्यांंकाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जात आहे.
जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून थांबवण्यात आले आहे. जिल्ह्यातील लाभार्थीसंख्येचा लक्ष्यांंक केंद्र शासनाकडून निश्चित झाल्यानंतर आणि राज्य शासनाने त्यास सहमती दिल्यावर लवकरच या मोफत गॅस कनेक्शन व साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून या योजनेकडे तसे फारसे लक्ष दिले नाही. तरीपण, आता राॅकेल वापरणे बंद करण्यात येणार असल्यामुळे या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेला महत्त्व येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.
मोफत लाभ दिला
६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता. त्यापैकी तब्बल ४४ हजार १५२ महिलांना या गॅस कनेक्शनसह त्याच्याशी संबंधित साहित्याचा लाभ मोफत देण्यात आला आहे. ६० हजार २८३ महिला लाभार्थ्यांचा लक्ष्यांंक दिला होता.