१८ कोटीच्या शौचालय स्वच्छता व देखभालीच्या ठेक्या प्रकरणी महापालिका वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 06:36 PM2020-12-27T18:36:45+5:302020-12-27T18:36:53+5:30
मीरा भाईंदर महापालिकेची शहरात सुमारे २०० सार्वजनिक शौचालये आहेत . सदर शौचालयांची स्वच्छता , देखभाल - दुरुस्ती आदी कामे हि पालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत केली जातात .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - सफाई आयोगाने शौचालये सफाई व देखभालीची कामे हि मेहतर , वाल्मिकी समाजाच्या संस्थांना देण्याचे निर्देश देऊन देखील त्याला केराची टोपली दाखवून मीरा भाईंदर महापालिका आणि सत्ताधारी भाजपाने संगनमताने १८ कोटी रुपयांचा शौचालये सफाईचा एकत्रित ठेका हा खाजगी ठेकेदारास दिल्याने कारवाईची मागणी होत आहे . तर ठेका दिल्या नंतर आता पालिकेने सफाई आयोगाच्या शिफारसीस शासनाने मान्यता दिल्यास अमलबजावणी करता येईल असा कांगावा चालवला आहे .
मीरा भाईंदर महापालिकेची शहरात सुमारे २०० सार्वजनिक शौचालये आहेत . सदर शौचालयांची स्वच्छता , देखभाल - दुरुस्ती आदी कामे हि पालिकेच्या बांधकाम विभागा मार्फत केली जातात . सदर शौचालये सफाईसाठी पालिकेने काहींना ठेके देखील विभागून दिले होते . परंतु जून २०१९ व जानेवारी २०२० मधील महासभेत सत्ताधारी भाजपाने सदर सर्व शौचालयांच्या दैनंदिन सफाई , देखभाल - दुरुस्ती साठी एकच ठेकेदार नेमण्याचा ठराव केला . त्या अनुषंगाने पालिकेने ३ नोव्हेम्बर रोजी शाईन मेंटेनन्स सर्व्हिसेस ह्या ठेकेदारास १८ कोटींचा ठेका दिला .
पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी मात्र ठेका देण्याची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे असे म्हटले . पालिकेच्या २०० शौचालयांची सफाई साठी कर्मचाऱ्यांवर ३ कोटी तर देखभाल दुरुस्तीवर ३ कोटी असा वर्षाला ६ कोटी रुपये खर्च होतो. सदर कंत्राट हे तीन वर्षां साठी १८ कोटींना दिले आहे . ठेकेदारास सफाई कर्मचारी हे प्राधान्याने वाल्मिकी व मेहतर समाजाचे नेमण्याची अट टाकली आहे . शासनाने सफाई आयोगाच्या शिफारशींना मंजुरी दिल्यावर अमलबजावणी करू असे ते म्हणाले .
तर सदर ठेक्यात एक टेंडरफेम नगरसेवकासह वादग्रस्त नेत्याचा सहभागची चौकशी झाली पाहिजे . पालिकेची लूट करण्यासाठी गैरप्रकार करून असे होलसेलच्या भावात एकत्रित ठेके दिले जात असल्याचा आरोप जिद्दी मराठा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जंगम यांनी केला . तर जनतेच्या पैशांची अशी कोट्यावधी रुपयांचे ठेके देऊन उधळपट्टी सुरु असून सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासन यांचे संगनमत असल्याचे सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता म्हणाले .
राज्य सफाई कर्मचारी आयोगाने स्पष्ट केले आहे कि , वाल्मिकी , मेहतर समाजातील सफाई कामगारांच्या संस्थांना शौचालयांच्या स्वच्छता व देखभालीची कामे देण्यात यावीत . तसे लेखी आदेश असून देखील मीरा भाईंदर महापालिकेने मात्र त्याचे उल्लंघन केले आहे . पालिका दिशाभूल आणि कांगावा करत असून एकत्र १८ कोटींचा ठेका खाजगी ठेकेदारास देऊन त्यांची आणि यात गुंतलेल्यांची तुंबडी भरण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप तक्रारदार तुषार गायकवाड यांनी केला आहे .
दरम्यान सत्ताधारी भाजपातील ज्येष्ठ नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी देखील , ह्या ठेक्यात गैरप्रकार झाला असून त्याचा सत्ताधारी भाजपाशी काही संबंध नाही . ठेका रद्द करून चौकशी करावी अशी मागणी केली आहे .