ठाण्याच्या काेविड सेंटरमधील १९४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:17 AM2020-12-28T00:17:36+5:302020-12-28T00:17:44+5:30
तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांची भरती : आरोग्य संघटनेची मागणी
- अजित मांडके
ठाणे : कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडू लागल्यामुळे ही महामारी जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांची भरती केली आहे. त्यानुसार सध्या तब्बल दोन हजार कर्मचारी या कोविड सेंटरमध्ये काम करीत आहेत. त्यातील ६० कर्मचारी कमी केले असले तरी उर्वरित १९४० कर्मचाऱ्यांना सेवेत कायम काम करण्याची संधी हवी आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाला सुरुवात झाली. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेचा स्टाफ कमी पडू लागला होता. तसेच रुग्णालयेदेखील कमी पडू लागली. त्यामुळे महापालिकेने शहराच्या विविध भागात तात्पुरती कोविड सेंटर सुरू केली. त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ सुरुवातीला तीन महिन्यांसाठी तर काही ठिकाणी सहा महिन्यांसाठी घेतले. परंतु, साथ सुरू राहिल्यास हे कंत्राट पुन्हा तीन ते सहा महिन्यांसाठी पुढे वाढविले.
त्यातही साथ आटोक्यात आल्यास या कर्मचाऱ्यांना त्या त्या वेळेस कामावरून कमी केले जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉक्टर, नर्सेस, आया, वॉर्डबॉय, पॅथॉलॉजिस्ट, इतर टेक्निशिअन आदींसह साफसफाई करणारा कर्मचारी वर्ग असा एकूण दोन हजारांचा स्टाफ भरती केला. परंतु, आता हळूहळू कोरोनाची साथ आटोक्यात येऊ लागल्याने महापालिकेने काही कोविड सेंटरही बंद केली आहेत. आजघडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ८०७ एवढी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा स्टाफही कमी केला आहे.
त्यानुसार आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. परंतु, ब्रिटनमध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यानुसार आणि पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने महापालिकेने इतर कोविड सेंटर सुरूच ठेवून तेथील स्टाफही तसाच ठेवला आहे. त्यानुसार १९४०चा स्टाफ अंदाजे कंत्राटी स्वरूपात काम करीत आहे. ही तात्पुरत्या स्वरूपाची नाेकरी संपुष्टात आल्यावर काय करायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे.