एटीएम कार्ड नसतांनाही अडीच लाखांची फसवणूक; दिरानेच घातली ‘टोपी’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 08:02 PM2017-11-09T20:02:22+5:302017-11-09T20:02:31+5:30

2 lakh fraud even if there is no ATM card; 'Hat' laid down | एटीएम कार्ड नसतांनाही अडीच लाखांची फसवणूक; दिरानेच घातली ‘टोपी’

एटीएम कार्ड नसतांनाही अडीच लाखांची फसवणूक; दिरानेच घातली ‘टोपी’

Next

ठाणे : कोपरीतील एका महिलेने एटीएम कार्डचा वापर न करताही तिच्या टीजेएसबीच्या बँक खात्यातून परस्पर दोन लाख ५८ हजार रुपये हडपण्यात आले होते. यासाठी बँक व्यवस्थापनालाच तिने जबाबदार धरले होते. कोपरी पोलिसांनी बँकेच्या मदतीने यातील ख-या भामट्याला पकडले असून तो सचिन कदम अर्थात तिचा दीर असल्याचे उघड झाले. लॉटरीच्या लालसेतून हा प्रताप केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.
एटीएम कार्डचा वापर न करताही तब्बल अडीच लाख रुपये आपल्या बँक खात्यातून परस्पर हडपण्यात आले असून त्याला ठाणे जनता सहकारी बँक (टीजेएसबी) व्यवस्थापनच जबाबदार असल्याचा दावा करून कोपरीतील अपर्णा कदम या गृहिणीने कोपरी पोलिसांकडे अलिकडेच तक्रार केली होती. बँक व्यवस्थापनाची यात नाहक बदनामी होत असल्यामुळे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी पोलिसांना आणि संबंधित कदम कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सुरुवातीलाच दिले होते. यात कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कोर्डे, दिगंबर भदाणे, हवालदार स्रेहा लेंबे यांनी या प्रकरणाचा तपास केला. बँकेच्या ठाणे विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक विनायक गोरे यांनीही ज्या ज्या ठिकाणाहून पैसे गेले त्या एटीएम केंद्राच्या सीसीटीव्हीची बारकाईने पडताळणी केली. तेव्हा कोपरीच्या एस बँक आणि युनियन बँकेच्या एटीएम केंद्रातून एक भामटा अगदी बिनधास्तपणे पैसे काढत असल्याचे आढळले. बँकेचे अधिकारी आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर कदम कुटूंबियांच्याकडूनही त्या भामट्याची ओळखपरेड केली. तेंव्हा तो बाहेरचा कोणीही नाही तर अगदी अलिकडेच कुटुंबातून वेगळा झालेला अपर्णा यांचाच दीर सचिन असल्याचे उघड झाले. अपर्णा यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांनी स्वत: एटीएम कार्डचा वापर केला नव्हता. पण सचिनने मात्र त्यांच्या नकळत त्याची चोरी करून सुरुवातीला २५ हजार नंतर पुन्हा २५ हजार असे करून तब्बल दोन लाख ५८ हजारांवर डल्ला मारला. २८ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर २०१७ या कालावधीत त्याने अपर्णा यांच्या टीजेएसबीच्या कोपरी शाखेतील बँक खात्यातून ही सर्व रक्कम काढल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे बँक खाते उघडल्यानंतर बँकेने एटीएम कार्ड देऊनही त्याचा एकदाही वापर केला नसल्याचा दावा कदम दाम्पत्याने केला होता. याप्रकरणी कदम यांनी कोपरी पोलिसांकडे तक्र ार केली होती. तांत्रिक त्रुटी किंवा कर्मचाºयांच्या संगनमताने हा अपहार झाल्याचे आरोपही त्यांपी केले होते. फसवणूक झालेली रक्कम बँकेने परत करावी, अशी मागणी त्यांनी बँकेकडे केली होती. मात्र, चोर आपल्याच घरातला निघाल्यानंतर कदम कुटूंबियांचे चेहरे खजिल झाले होते.

गावी जाताच संधी साधली...
अपर्णा कदम या कुटूंबासह अलिकडेच रायगड येथे गेल्या होत्या. हीच संधी साधून सचिनने घराची बनावट चावी बनवून टीजेएसबीचे किट, एटीएम कार्ड चोरुन हा डल्ला मारला.

लॉटरीच्या लालसेने चोरी
कदम यांच्या खात्यातून चोरी करणारा नेमका चोर कोण याची उकल केल्यानंतर पोलीस निरीक्षक भदाणे यांच्या पथकाने सचिनकडे विचारणा केली. तेंव्हाही सुरुवातीला त्याने आपण त्या गावचेच नसल्याचा आव आणला. त्याला पुराव्यानिशी पुन्हा त्यांनी ‘बोलते’ केल्यानंतर मात्र त्याने या प्रकाराची कबूली दिली. चोरलेले पैसे ठाणा कॉलेज जवळील एका लॉटरी सेंटर मध्ये हारलयाचेही तो म्हणाला. त्याला बुधवारी रात्री ८ वा. च्या सुमारास अटक केली असून ठाणे न्यायालयाने त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशा दिले आहेत.

‘टोपी’ घातली तरी पकडला गेला
सचिन कदम याने कोपरीच्या एस बॅकेच्या एटीएम मधून पैसे काढतांना ओळख पटू नये म्हणून जॅकेट आणि टोपी घातली होती. त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तर युनियन बँकेतून पैसे काढतांना तो नेमका कॅमेºयासमोर आला. त्यामुळे सायबर क्राईमच्या मदतीने कोपरी पोलिसांनी त्याला अलगद पकडले.

‘‘ पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज आणि एटीएमची बँकेद्वारे कशी सुरक्षा घेतली जाते, त्याचीही माहिती दिली. एटीएमचा वापर केलेला नाही, असे अपर्णा कदम सांगत होत्या. मात्र एटीएमवरील स्क्रॅचेसवरुन त्याचा वापर झाल्याचे उघड झाले होते. पुढे सीसीटीव्हीतून खरा चोर कोण ते उघड झाले. ग्राहकांनी आपल्या एटीएम कार्ड आणि त्याच्या पासवर्डची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.’’
- विनायक गोरे, सहायक सरव्यवस्थापक, ठाणे विभाग, टीजेएसबी.

Web Title: 2 lakh fraud even if there is no ATM card; 'Hat' laid down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा