भिवंडी: शांतीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल व ऑटो रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत असल्याने शांतीनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कारवाईत एक रिक्षा व नऊ दुचाकी असा ४ लाख ३५ हजार रुपये किमतीची वाहने जप्त करीत दहा गुन्ह्यांची उकल केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपी मध्ये मुख्य सुत्रधार हा तडीपार गुंड असून त्याचे दोन साथीदार हे अल्पवयीन युवक असून मौजमजा करण्यासाठी हे तिघे वाहन चोरी करीत होते अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना पाहता शांतीनगर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे व सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने गस्त सुरू केली असता,एक तडीपार गुन्हेगार व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळून एक रिक्षा व नऊ दुचाकी अशा ४ लाख ३५ हजार रुपयांच्या वाहनांची चोरी केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे हे तिघे चोरटे मौजमजा करण्यासाठी मुंबई चौपाटी,फाईव्ह स्टार हॉटेल फिरण्या साठी या वाहनांची चोरी करायचे व पेट्रोल संपले की वाहन तेथेच सोडून निघून जायचे. यामधील मुख्य आरोपी शेरअली इमाम फकीर उर्फ पिल्या हा निजामपूर पोलिस ठाण्यातुन तडीपार केलेला गुन्हेगार असून यांच्या कडून जप्त केलेल्या वाहनांच्या आधारे एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.