नितीन पंडित, भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वाहुली गावाच्या हद्दीत पत्र्याच्या बनविण्यात आलेल्या गोदामांना मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.येथील गोदामात मोठ्या प्रमाणावर अवजड साहित्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व लाकडी व फायबर पॅलेट ,तर काही गोदामात भंगार कागदाचे गठ्ठे, मंडप साहित्य साठविले होते.
आग पाहता पाहता पसरत गेल्याने या आगीत २० गोदाम जळून खाक झाली . पडघा पोलिसांनी आगीची माहिती दिल्याने भिवंडी व कल्याण अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . आग ग्रामीण भागात लागलेली असल्याने तेथे आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असल्याने सकाळी आठ वाजता पर्यंत आग धुमसत होती.या आगीचे कारण अस्पष्ट असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.ही आग पूर्ण विझण्या साठी त्यानंतर पाच तास अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थ करावी लागली.अखेत सायंकाळी हि आग आटोक्यात आली.