- पंकज रोडेकरठाणे - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१७ या वर्षभरात एकूण ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातात २१७ जणांचा बळी गेला आहे. तर, गंभीर आणि किरकोळ अपघातांची संख्या ७०५ इतकी आहे. यात नारपोली या वाहतूक उपशाखेच्या हद्दीत सर्वाधिक ७९ प्राणांतिक अपघात घडले असून त्यामध्ये ३५ जणांचा बळी गेला आहे. उल्हासनगर, विठ्ठलवाडी, बदलापूर पश्चिम आणि वागळे इस्टेट या पोलीस ठाणेअंतर्गत एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याने तेथे कोणीही दगावले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या एकूण १८ उपशाखा आहेत. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर ही शहरे पाच परिमंडळांतर्गत वेढलेले असून तेथे या उपशाखेद्वारे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याचे काम करण्यात येते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, गुजरात आदी भागांत जाणारी जडअवजड वाहने ही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातूून येजा करतात. त्यातच, दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येतही वाढ होत असल्याने शहरांमध्ये वाहतूककोंडीही पाचवीला पुजलेली आहे. मागील वर्षभरात आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २१७ प्राणांतिक, गंभीर ४५६ आणि २४९ किरकोळ अशा एकूण ९२२ अपघातांची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.परिमंडळानुसार विचार केल्यास ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांत प्राणांतिक अपघातांत ९१ जणांचा मृत्यू झाला. तर,भिवंडीत ६८, कल्याण-डोंबिवलीत ३४,उल्हासनगर परिमंडळात २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जानेवारीत ३३ तर फेब्रुवारीत २२ दगावले२०१८ च्या पहिल्या दोन महिन्यांत ५५ प्राणांतिक, ७० गंभीर तर ४९ किरकोळ अपघात असे एकूण १७४ अपघात झाले आहे. यामध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यात ३३ तर फेब्रुवारी महिन्यात २२ जण रस्ते अपघातात दगावले आहेत.बळींचा आकडा ३१ वाढला२०१७ मधील पहिल्या दोन महिन्यांत २४ जण अपघातात ठार झाले होते. तर, २०१८ मध्ये रस्ते अपघातात ५५ जणांचा मृत्यू झाल्याने यंदा बळींची संख्या ३१ ने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. तसेच २०१७ मध्ये १९० जखमी झाले होते. तर २०१८ मध्ये १७५ जखमी झाले असून जखमींची संख्या मात्रयंदा १५ने कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
९२२ अपघातांत २१७ मृत्यू, २०१८ मध्ये ठाण्यात ५५ जण अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:50 AM