सुरेश लोखंडे ठाणे : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून आणि अंगणवाडी सेविकांना सुखद धक्का देत राज्य शासनाने नवीन १८३ अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यात सेविकांच्या नियुक्तीचेही आदेश जारी केले आहेत.
लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या मान्यता देण्यात आल्या आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील ४० अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त कार्यालयास शनिवारी यासंदर्भात आदेश प्राप्त झाले. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात तब्बल ४० अंगणवाडी केंद्रांना मान्यता मिळाली आहे.यात २० मिनी अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. उर्वरित २० बालवाडी केंद्रांचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात आले. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यात एक हजार ८९४ अंगणवाडी केंद्रांचा समावेश राहणार आहे. याप्रमाणेच अन्य जिल्ह्यांतही अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये सर्वात कमी धुळे आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी सहा अंगणवाडी केंद्रांना नव्याने मजुरी मिळाली आहे. ५० अंगणवाडी केंद्रांना नंदुरबार जिल्ह्यात मान्यता मिळाली आहे. अन्य जिल्ह्याप्रमाणेच अकोला जिल्ह्यात १६ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळाली. चंद्रपूरला २३, लातूरला ११, वर्धाला सात आणि वाशिम जिल्ह्याला १९ अंगणवाडी केंद्र मंजूर झाली आहेत.यात ठाणे जिल्ह्यातील ४० अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर अंगणवाडी सेविका व मदतनिसांची पदे भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.‘ग्रामीण,आदिवासी भागाला प्राधान्य द्यावे’केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या मात्र कार्यान्वित नसलेल्या ७८५ केंद्रांपैकी १८३ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात या केंद्रांना प्राधान्यक्रमाने सुरू करण्याचे आदेश आहेत. यामध्ये झोपडपट्टी, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि अल्पसंख्याकबहुल क्षेत्राचा प्राधान्याने समावेश करण्याचे आदेश आहेत.