रेंटलच्या २१ घरात ४३ कुटुंबाचे वास्तव्य
By admin | Published: May 10, 2017 12:01 AM2017-05-10T00:01:42+5:302017-05-10T00:01:42+5:30
रस्ता रुंदीकरीण करीत असतांना पालिकेने अनेकांचे तत्काळ पुनर्वसन केले आहे. दुसरीकडे नाला रुंदीकरणासाठी वागळे येथील सम्राट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्ता रुंदीकरीण करीत असतांना पालिकेने अनेकांचे तत्काळ पुनर्वसन केले आहे. दुसरीकडे नाला रुंदीकरणासाठी वागळे येथील सम्राट अशोकनगर भागातील रहिवाशांची घरे पालिकेने पाडली होती. यावेळी येथील ४३ रहिवाशांचे तात्पुरते मानपाडा येथील रेंटलच्या २१ घरांमध्ये पुनर्वसन केले होते. परंतु,आता ११ महिने उलटून गेल्यानंतरही या रहिवाशांना दाटीवाटीने राहावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन केले की धूळफेक असा सवाल त्यांनी केला आहे.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. ती हाती घेतांना रहिवाशांना पुनर्वसनाची हमी मिळत असल्याने तिला यश मिळत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, पुनर्वसनामागचे काही दोष आता पुढे आल्याचे सम्राट अशोकनगरच्या रहिवाशांकडे पाहिल्यास स्पष्ट होईल. वागळे इस्टेट येथील सम्राटनगर भागातील नाला रुंदीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले होते. त्यानुसार येथील रहिवाशांना १० जूनच्या रात्री ११ वाजता घरे खाली करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांचे मानपाडा येथील रेंटलच्या घरांमध्ये पुनर्वसनाची हमी देखील देण्यात आली. त्यानुसार रहिवाशांनी घरे मिळणार या हेतून येथून काढता पाय घेतला. त्यावेळेस येथील ४३ कुटुंबांना येथून हलविण्यात आले.