मनसेच्या अविनाश जाधवसह ५ जणांना अटक, कायदा हातात घेतल्याने कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 08:50 PM2017-10-23T20:50:45+5:302017-10-23T20:51:07+5:30
ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कायदा हातात घेऊन कारवाईचा बडगा उगारणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पाच जणांना ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. याप्रकरणी आणखी सहा ते सात जणांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एल्फिस्टन रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा नाहक बळी गेल्यानंतर मनसेने मुंबईत राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची रेल्वे प्रशासनाला ताकीद दिली होती. या कारवाईसाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत देऊन मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशाराही दिला होता. ही मुदत संपताच ठाणे आणि कल्याण परिसरात मनसेने आंदोलन केले. ठाण्यात शहरप्रमुख जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी फेरीवाल्यांना पिटाळण्यासाठी १० ते १२ फेरीवाले तसेच हातगाडीवरून विक्री करणाºयांच्या सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. सॅटीस ब्रिजवरील विक्रेत्यांचे बाकडे तोडून त्याचे नुकसान करणे तसेच रिक्षाचालकांना हुसकावून लावल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनीच २१ आॅक्टोबर रोजी फिर्याद दाखल केली होती. तर सॅटीस पुलाच्या खाली ट्रॅफिक चौकीच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांचे सामान फेकून, नुकसान करणे तसेच त्यांना दमदाटी आणि मारहाण करणे, रिक्षा चालकांना दमदाटी केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यातही पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली होती. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने अविनाश जाधव, महेश कदम, रविंद्र मोरे, रवींद्र सोनार आणि संदीप साळुंखे या पाच जणांना सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. यातील आणखी सहा ते सात जणांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली. नौपाडा पोलिसही फेरीवाल्यांच्या गुन्ह्यात याच आरोपींना ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.