मालमत्ताकर वसुलीचे ५०० कोटींचे लक्ष्य
By admin | Published: April 4, 2016 01:58 AM2016-04-04T01:58:55+5:302016-04-04T01:58:55+5:30
शहरातील मालमत्तांच्या जीआयएस सर्व्हेची कल्पना अपयशी ठरल्यानंतर आता पुन्हा मालमत्ता कर विभागाच्या खाजगीकरणाचा घाट पालिकेने घातला आहे
ठाणे : शहरातील मालमत्तांच्या जीआयएस सर्व्हेची कल्पना अपयशी ठरल्यानंतर आता पुन्हा मालमत्ता कर विभागाच्या खाजगीकरणाचा घाट पालिकेने घातला आहे. मालमत्तांचा सर्व्हे करणे आणि त्यांच्याकडूनच मालमत्ताकराची वसुली करण्याचे काम खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी खाजगीकरणाचा फसलेला प्रयोग अजूनही विस्मृतीत गेला नसताना पुन्हा खाजगीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पीपीपीच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोट्यवधींचा खर्च करून शहरातील मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे केला गेला. तो अपयशी ठरल्याची कबुली आयुक्तांनी दिली आहे. शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचा खाजगी संस्थेमार्फत नव्याने सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हीच संस्था मालमत्ता करवसुलीचेही काम करणार आहे. तीन प्रकारच्या मालमत्तांचा सर्व्हे केला जाणार असून यामध्ये निवासी, निवासी मालमत्तेचे व्यापारी मालमत्तेत केलेले परिवर्तन आणि व्यापारी यांचा समावेश आहे. यामाध्यमातून शहरात नेमक्या कोणत्या व किती मालमत्ता आहेत, त्यापैकी किती मालमत्ताधारकांनी चुकीची माहिती देऊन पालिकेचे उत्पन्न बुडवले आहे, याची माहिती होणार आहे. सर्व्हे व सक्त वसुलीमुळे पालिकेचे उत्पन्न ५०० कोटींच्या वर जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. हे काम करणाऱ्या खाजगी संस्थेला उत्पन्नातील काही हिस्सा दिला जाणार आहे.