ठाण्यात एका आठवड्यात आढळले कोरोनाचे नवे ५१ रुग्ण
By अजित मांडके | Published: September 8, 2023 06:40 PM2023-09-08T18:40:29+5:302023-09-08T18:41:12+5:30
कोरोना चाचणीची संख्या आजपासूनच वाढविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ठाणे : मागील दोन वर्षे कोरोनाने सर्वांनाच हैराण केले होते. त्यानंतर आता ठाण्यात पुन्हा एकदा कोरोनोने डोके वर काढल्याचे दिसत आहे. मागील आठ दिवसात ठाण्यात नव्या ५१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सर्तक झाले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाला खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना चाचणीची संख्या आजपासूनच वाढविली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
वातावरणातील होणाºया बदलामुळे ठाण्यात मागील काही महिन्यात मलेरीया, डेंग्यु, लेप्टो आदींसह इतर साथ आजरांच्या रुग्णात वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशात आता कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. मागील दोन वर्षे कोरोनाने ठाण्यात थैमान घातले होते. परंतु आता कोरोना आजाराचे रुग्ण आढळत असले तरी त्या आजाराची दाहकता कमी झालेली आहे. असे असले तरी देखील आता एका आठवड्यात ५१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने पालिका प्रशासन सर्तक झाली आहे.
या नव्या ५१ रुग्णांपैकी ४ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात एका दहा महिन्यांच्या मुलीचा देखील समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर उर्वरीत रुग्ण हे होमकॉरंटाईन असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान मागील तीन महिन्यात दर महिना साधारपणे ४० ते ४५ रुग्ण आढळून येत होते. तर दर दिवशी ३५० च्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जात होत्या. परंतु असे असतांनाही आता मात्र एका आठवड्यात रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने पालिका सर्तक झाली आहे. कोरोनाचा हा नवा व्हॅरीएन्ट असल्याचा अंदाजही पालिकेने वर्तविला आहे.
दरम्यान आता शनिवार पासूनच कोरोना चाचण्यांची संख्या ही ३५० वरुन ७०० केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य केंद्रात त्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यात येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येत असल्याने या कालावधीत अधिक सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
रुग्ण संख्या वाढत असली तरी देखील घाबरण्याचे कारण नाही. जे नव्याने रुग्ण आढळले आहेत, त्यातील ४ रुग्ण हे रुग्णालयात दाखल होते, तर उर्वरीत रुग्णांवर घरीच उपचार झालेले आहेत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणीची संख्या वाढविण्यात येत आहे.
(संदीप माळवी - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)