जिल्ह्यात साडेआठ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:33 AM2019-07-30T00:33:41+5:302019-07-30T00:34:01+5:30

पालक हवालदिल: जाचक अटींमुळे अडले आरटीई प्रवेश

8,000 vacant seats in the district | जिल्ह्यात साडेआठ हजार जागा रिक्त

जिल्ह्यात साडेआठ हजार जागा रिक्त

googlenewsNext

सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्य आदी उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या ६५२ शाळांमध्ये ‘शिक्षणाचा हक्क’ (आरटीई) या कायद्याखाली २५ टक्के जागा शालेय प्रवेशासाठी आरक्षित आहेत. यानुसार, सुमारे १४ हजार ५७७ जागा रिक्त ठेवल्या होत्या. त्यासाठी १३ हजार ४०० बालकांसाठी निवड झाली होती. यातून लॉटरी सोडतद्वारे निवड झालेल्यांपैकी केवळ सुमारे पाच हजार ८१५ बालकांचे आतापर्यंत केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले. उर्वरित सुमारे आठ हजार ७६२ जागा जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शाळांमध्ये रिक्त असल्याचे उघड झाले आहे.

आरटीईच्या या २५ टक्के आरक्षणाच्या शालेय प्रवेशासाठी पालकांनी त्यांच्या १६ हजार ३२६ बालकांचे आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले होते. यातून गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी प्रवर्गांतील बालकांसाठी सुमारे १४ हजार ५७७ जागा आरक्षित होत्या. यासाठी जिल्ह्यासह महापालिका व नगरपालिका क्षेत्रांतून १६ हजार ३२६ बालकांचे आॅनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी १३ हजार ४०० बालकांची विविध निकषास अनुसरून निवड झाली. यातून तीन फेऱ्यांमध्ये लॉटरी सोडत काढली असता त्याद्वारे निवड झालेल्यांपैकी आतापर्यंत पाच हजार ८१५ बालकांचे प्रवेश झाले. निवड झालेल्या सात हजार ५८५ बालकांचे प्रवेश झाले नाही. रिक्त जागांपेक्षा कमी विद्यार्थ्यांची निवड झालेली असतानाही बालकांच्या शालेय प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे.

यामुळे अडले प्रवेश
प्रवेश राउंडच्या पहिल्या लॉटरी सोडतमध्ये पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली होती. त्यापैकी तीन हजार ९६७ बालकांनी शालेय प्रवेश घेतले. उर्वरित एक हजार ९२९ बालकांच्या पालकांनी दिलेल्या शाळेत जाऊन प्रवेश घेतला नाही, तर काहींना कागदपत्रांची समस्या होती. शाळा लांब असल्यामुळे काही पालकांनी प्रवेश नाकारले. आवडीची शाळा नसल्यामुळेही काही पालक शाळेच्या संपर्कात आले नाही. काही शाळांना या ना त्या कारणाखाली प्रवेश नाकारले. शुल्क आकारणीच्या कारणांसह शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्यखरेदीच्या नावाखाली काही शाळांना पालकांची अडवणूक केल्यामुळे प्रवेशास अडथळे निर्माण झाल्यामुळे काही शालेय प्रवेश होऊ शकले नाही. यामुळे पालक पुरते हवालदिल झाले आहेत.

तिसºया फेरीत ५२४ प्रवेश
याप्रमाणेच दुसºया राउंडमध्ये दोन हजार ६४३ बालकांची निवड झाली. त्यातील एक हजार ३२४ बालकांचे प्रवेश निश्चित झाले. तर, तिसºया फेरीला एक हजार ३१४ बालकांची लॉटरी सोडत काढली असता त्यातून केवळ ५२४ बालकांचे आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. यानंतरच्या प्रवेश राउंडबाबत अजून कोणत्या सूचना आलेल्या नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी पहिल्या फेरीत तीन हजार ९५७ बालकांचा प्रवेश निश्चित झाला.

Web Title: 8,000 vacant seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.