ठाणे: अगरबत्ती विक्रीच्या नावाखाली चक्क विदेशी स्कॉच मद्याची विक्री करणा-या दोघांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने दोन कोटींचा मद्याचा साठा हस्तगत केला. त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरातून नऊ लाखांचा अतिरिक्त मद्यसाठा हस्तगत केला आहे. पुंजालाल पटेल आणि बिपीन शहा या दोघांनाही तीन दिवस उत्पादन शुल्कची कोठडी न्यायालयाने दिली आहे.मुंबईतील खार जिमखाना भागातून कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटणे तसेच मुंबई भरारी पथक -१ चे निरीक्षक मनोज चौधरी यांच्या पथकाने रविवारी रात्री पुंजालाल पटेल याच्याकडून विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बिपीन शहा याच्याकडून अंधेरीतील ‘अॅमरॉन्ड अपार्टमेंट’ मधील गाळा क्रमांक २३ मधून विदेशी स्कॉचचे १७५ बॉक्स हस्तगत केले. भाडयाने घेतलेल्या या गाळयात अगरबत्ती विक्रीसह विदेशी मद्याचीही बेकायदा विक्री केली जात होती. या छाप्यात आयात शुल्क न भरलेल्या विदेशी स्कॉचच्या वेगवेगळया कंपन्यांचा दोन कोटींचा मद्यसाठा या पथकाने जप्त केला.