टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीत ९३.५० टक्के मतदानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:40 PM2017-10-28T17:40:40+5:302017-10-28T18:16:24+5:30
शिवसेनेची अस्तित्वाची निवडणुक म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्या टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीत शनिवारी ९३.५० टक्के मतदानाची नोंद झाली. १८८९ पैकी १७६८ मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला.
ठाणे - तब्बल १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या मान्यताप्राप्त टिएमटी एम्पलॉईज युनियनच्या निवडणुकीची प्रक्रिया शनिवारी शांततेत पार पडली. १८८९ मतदारापैंकी तब्बल १७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ९३.५० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपा या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीच्या रंगत इतिहासात प्रथमच वाढल्याचे दिसून आले. एकूणच आता या मान्यता प्राप्त युनियनचा झेंडा कोणाच्या हाती जाणार हे पाहणे आता महत्वाचे ठरले आहे. ठाणे परिवहनच्या एम्पालॉईज युनियनची निवडणुक प्रथमच प्रचाराची रणधुमाळी पाहण्यास मिळाली आहे. शिवसेनेने आपला झेंडा आबादीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. तर प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाने देखील शिवसेनेची हवा मात्र चांगलीच तंग केली आहे. शरद राव प्रणीत प्रगती पॅनलने देखील गनीमा काव्याने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले होते. परंतु भाजपाकडून सुरु असलेल्या श्रेयवादाच्या लढ्याचा सामना करण्यासाठी शिवसेनेला प्रथमच तारेवरची कसरत करावी लागली.
दरम्यान शनिवारी सकाळी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार म्हणून पहाटे पासूनच एन. के. टी महाविद्यालय परीसराच्या आवाराजवळ चोख पोलीस बंदोबस्त रात्री पासून लावण्यात आला होता. तर पहाटे पाच वाजल्यापासून परिवहन समितीचे सभापती अनिल भोर आणि सदस्य राजेंद्र महाडीक यांनी तळ ठोकला होता. त्यानंतर सकाळी ठिक सात वाजपा मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. परंतु याठिकाणी देखील भाजपाचे आमदार संजय केळकर, शिवाजी पाटील, नगरसेवक कृष्णा पाटील, सुनेश जोशी, भरत चव्हाण आदींनी हजेरी लावल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी देखील मग याठिकाणी दिवसभर तळ ठोकल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक संजय भोईर, राम रेपाळे, संजय भोसले, प्रकाश पायरे आदींसह इतर पदाधिकाऱ्यानी हजेरी लावली होती. त्यामुळे येथील वातावरण देखील काही काळ तंग झाले होते.
या निवडणुकीच्या माध्यमातून सात पदाधिकारी आणि ३० सदस्य निवडून येणार आहेत. यासाठी तब्बल ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु खरी लढत ही शिवसेना विरुध्द भाजपा अशीच काहीशी होणार असल्याचेच दिसून आले आहे. एकूणच शनिवारी सांयकाळी पाचवाजेपर्यंत ९३.५० टक्के मतदानाची नोंद झाली असून १८८९ मतदारांपैकी १७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु निकाल मात्र रात्री उशिरा लागणार आहे.