मीरा रोड : मुलुंडमध्ये एका मराठी कुटुंबाला दुकानासाठी गाळा देण्यास नकार दिल्याची घटना ताजी असतानाच मीरा रोडमध्येही एका नव्या संकुलात मराठी माणसाला घर नाकारण्यात आले आहे. या संकुलातील जाहिरातीमध्ये अमराठींना प्राधान्य देण्याच्या जाहिरातीवर मनसे,
मराठी एकीकरण समितीने टीका केली. त्यानंतर संबंधितांनी ती जाहिरात हटवून दिलगिरी व्यक्त केली आहे.
समाजमाध्यमांवर मिलियन एकर्स या सोल एजंटकडून जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात घरासाठी अमराठींना प्राधान्य, असे नमूद केले होते. त्यावरून मनसेचे सचिन पोपळे, संदीप राणे यांनी संबंधित मिलियन एकर्सविरोधात संताप व्यक्त करत त्यांच्या कार्यालयात कॉल करून निषेध केला व कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर मिलियन एकर्सकडून ती जाहिरात हटविण्यात आली व दिलगिरी व्यक्त केली.
आमदार गीता जैन यांची पोलिसांत तक्रार
या जाहिरातीमधील बांधकाम प्रकल्प आमदार गीता जैन यांचा असल्याचे मेसेज व्हायरल करून काही जणांनी टीका सुरू केली आहे. हा प्रकार आमदार जैन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नवघर पोलिस ठाण्यात याविरूद्ध लेखी तक्रार दिली आहे. ही पोस्ट त्यांची वा त्यांच्या सोनम बिल्डरची नसून राजकीय द्वेष व आपली बदनामी करण्यासाठी तसेच समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नाहक आपले नाव जोडण्याचे कारस्थान केले आहे.
सोनम बिल्डरच्या जुन्या अशा गीतानगर, गोल्डन नेस्ट, न्यू गोल्डन नेस्टपासून इंद्रप्रस्थ अशा अनेक संकुलात मराठी कुटुंबेही मोठ्या संख्येने राहात असून, आम्ही कधी असा भेदभाव केलेला नाही. असे कटकारस्थान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आ. गीता जैन यांनी केली आहे.