ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
By सुरेश लोखंडे | Published: May 5, 2024 10:33 PM2024-05-05T22:33:19+5:302024-05-05T22:33:34+5:30
तीनही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
ठाणे : लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया २० मेराेजी होत आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायचे असून निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले काम हे गांभीर्यपूर्वक करावे, असे निर्देश भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात दाखल झालेल्या सर्व निवडणूक निरीक्षकांनी तीनही लोकसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच पोलीस यंत्रणांना आज झालेल्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आज निवडणूक निरीक्षकांनी आढावा घेतला. त्यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक जे.श्यामला राव , खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक मनोज जैन , खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल आणि पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राजनवीर सिंग कपूर, खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी आणि पोलीस निरीक्षक के. जयरामन उपस्थित होते. तसेच तीनही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपापसात उत्तम समन्वय साधावा. मतदारसंघात संवेदनशील असलेल्या मतदार केंद्रांवर लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. मतदारसंघात पुरेशा प्रमाणात व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतील व ते संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने स्टार कॅम्पेनअरचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून ठेवावे. तसेच रॅली, प्रचारामध्ये विहीत परवानगी घेतलेली वाहनेच असतील. विनापरवाने वाहने आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही राव यांनी यावेळी दिले.