मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील मोठी दगडी भिंत हि पाऊस आणि वाऱ्याने कोसळून मुख्य रस्त्यावर पडली. त्यामुळे वाहन व पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊन अपघाताची भीती व्यक्त होत आहे. डोंगरी खदान - आईस फॅक्ट्री जवळ मुख्य रस्त्यावर खाजगी जागा असून त्या ठिकाणी दगडे रचून मोठी लांब भिंत उभारलेली आहे. सदर दगडी भिंत हि पक्की नसल्याने रस्त्यावर कोसळण्याचा नेहमीच धोका होता. त्यामुळे तत्कालीन नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सदर भिंत काँक्रीटची पक्की बांधावी म्हणून मागणी केली होती.
बुधवारी रात्री उशिरा सदर मोठी दगडी भिंत दोन ठिकाणी कोसळून दगड रस्त्यावर आले . सदर रस्ता अरुंद असून वाहने भरधाव असतात. त्यामुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून पादचाऱ्यांना देखील येथून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. जमीन मालकाने पक्की भिंत न बांधता केवळ दगडे रचून असुरक्षितपणे भिंत उभारली व ती पडून दगड रस्त्यावर आल्याने तात्काळ जमीन मालका कडून पक्की भिंत उभारून घ्यावी अन्यथा लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.