लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकावर ACBची कारवाई; बलात्काराबद्दलची कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
By जितेंद्र कालेकर | Published: December 5, 2022 07:22 PM2022-12-05T19:22:53+5:302022-12-05T19:23:12+5:30
बलात्काराबद्दलची कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर ACBने कारवाई केली.
ठाणे : बलात्कारासह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलमांची कारवाई न करण्यासाठी संबंधितांकडून ३५ हजारांची लाच घेणाऱ्या मुंब्रा पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहीगुडे (५२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ, ३२३ आणि ५०४ अर्थात कौटुंबिक हिंसाचारासह हुंडाबंदी अधिनियम कलम चार हा गुन्हा दाखल आहे.
याच गुन्हयात कलम ३७६ आणि आयटी अॅक्टप्रमाणे कारवाई न करण्यासाठी आरोपी लाहीगुडे याने १ डिसेंबर २०२२ रोजी ८० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदारांनी याप्रकरणी ठाणे एसीबीमध्ये तक्रार दिली. त्यानुसार याबाबत एसीबीच्या पथकाने पडताळणीही केली. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सापळा रचून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ३५ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारतांना लाहीगुडे याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील या अधिक तपास करीत आहेत.