ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अमरजीत यादव याला ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी आता ठाणे कारागृहात करण्यात येणार आहे.
सोमवारी सांयकाळी पिंपळे या त्यांच्या पथकासह कासारवडवली येथील बाजारपेठेतील अनिधकृत फेरीवाले आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. कारवाई सुरू असताना, यादव याने रागाच्या भरात हाती चाकू घेऊन पिंपळे याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून हाताची बोटे तुटली होती. तसेच त्यांना वाचिवण्यासाठी पुढे आलेल्या अंगरक्षक यांच्याही हाताचे एक बोट कापले गेले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर कासारवडवली पोलिसांनी हल्लेखोर यादव याला अटक केली. त्यानुसार यादव याला ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी आता ठाणे कारागृहात करण्यात येणार आहे.