कल्याण : डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. तिचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केले आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. तसेच या प्रकरणात राजकीय दबाव येता कामा नये, असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी शुक्रवारी डोंबिवलीत केले.
शेख यांनी सायंकाळी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, हे प्रकरण आता प्राथमिक पातळीवर आहे. या प्रकरणाचा खटला न्यायालयाच्या फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा. यातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून यापुढे अशाप्रकारचा गंभीर गुन्हा करण्यास महाराष्ट्रात कुणी धजावणार नाही.
दरम्यान, डोंबिवलीतील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार भारती लव्हेकर यांनीही मानपाडा पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची भेट घेत घटनेची माहिती घेतली. त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विचारांनी पुरोगामी असले पाहिजेत. ज्या ‘शक्ती’ कायद्याविषयी बोलले जात आहे, त्या शक्ती कायदा कमिटीवर मी सदस्य आहे. दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आणला जात आहे. मात्र, ज्या वर्मा कमिटीने जे कायदे केले आहेत, त्यांची अंमलबजावणीही केली जात नाही. शक्ती कायद्यान्वये महिलांच्या सुरक्षिततेचा विषय बाजूला राहतो. महिलांच्या सुरक्षिततेविषयी राजकारण केले जाते. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून हा कायदा मंजूर करावा.’