ठाणे : एसटीतून प्रवास करताना अत्यंत गलिच्छ भाषेत पत्नीला मोबाइलवरून शिवीगाळ करताना राग अनावर झाल्याने त्याच बसमधील पार्वती ठाकूर (७५) या वृद्धेवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सुमेध करंदीकर या आरोपीला दहा वर्षांच्या कारावासाची आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एल. भोसले यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कैदेची शिक्षा आराेपीला भाेगावी लागणार आहे.
बोरीवलीतील रहिवासी सुलभा ठाकूर (२८) आणि त्यांच्या सासू पार्वती या दोघी ७ एप्रिल २०१७ रोजी ठाण्यात काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यांचे ठाण्यातील काम आटोपल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास त्या ठाणे ते बोरीवली या एसटी बसमध्ये बसल्या. त्याच बसमध्ये सुमेध करंदीकर हा प्रवासी त्याच्या पत्नीशी मोबाइलवरून भांडण करीत होता. या वादामध्ये तो तिला शिवीगाळ करीत होता. त्याला शिवीगाळ न करण्याबाबत इतर प्रवाशांनीही समजावले. मात्र, विनावाहक बस असल्यामुळे तिला कुठे थांबाही नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी समजावून सांगूनही सुमेधवर काहीच परिणाम झाला नाही. त्याने प्रवाशांनाच शिवीगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिली. एका प्रवाशाने बस थांबविण्याचा इशारा चालकाला केला.
त्याच दरम्यान सुमेध याने पिशवीतील गावठी कट्टा काढून बसमधील पार्वती यांच्या दिशेने गोळीबार केला. यात त्यांच्या उजव्या खांद्याच्या पाठीमागील बाजूला गाेळी लागून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर इतर प्रवाशांनाही त्याने याच गावठी कट्ट्याच्या धाकावर धमकी दिली. हे थरारनाट्य सुरु असतानाच चालकाने नागलाबंदर पोलिस चौकीजवळ बस थाबवली. तेव्हा प्रवाशांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.
याच खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयात ३० जानेवारी २०२४ रोजी झाली. यामध्ये दोन डॉक्टर आणि तपास अधिकाऱ्यासह १४ साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.पोलिसांच्या तपासावर ताशेरे-
तपास अधिकारी बी.एस. तांबे यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. तपास व्यवस्थित न केल्यामुळे आरोपीची आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली. न्यायालयात आरोपपत्र दाखल करतानाच आरोपीने गावठी कट्टा वापरल्याबाबतचा अहवाल देऊन ते सादर करण्याची पोलिस आयुक्तांची परवानगी तपास अधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित होते. दोषारोपपत्र सादर केल्यानंतर ती परवानगी घेण्यात आली. या त्रुटीमुळे आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात आरोपीची निर्दोष सुटका झाली.