ठाणे: मांगले दाम्पत्यासह गँगस्टर रवी पुजारी टोळीविरुद्ध ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. मांगलेविरुद्ध दाखल केलेली खंडणीची तक्रार मागे घेण्यासाठी रवी पुजारी टोळीकडून ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोपलवार यांच्याकडून सात कोटींची खंडणी मागणा-या सतीश मांगले आणि त्याची दुसरी पत्नी श्रद्धा यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी अटक केली. याच प्रकरणात त्यांचा आणखी एक साथीदार भरत तावडे आणि अनिल वेदमेहत याच्याविरुद्धही सबळ पुरावा मिळाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली आहे. मोपलवार यांना १२ नोव्हेंबर रोजी पुजारी याने फोनवरुन धमकी दिली. ‘‘तुने तो संतोष मांगले को फसाया, कोर्ट में जाके अॅफीडेव्हिट कर की, मांगले का इस केसमें कोई हाथ नहीं है, और केस पीछे ले,और वो सात करोड रु पये का क्या हुआ, वो दे देना...मैं कौन बात कर रहा हूं, मालूम है ना? मैं रवी पुजारी बात कर रहा हूॅँ ....’’ असा धमकीचा फोन मोपलवार यांना विदेशातून आला आहे. या फोनमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मांगले आणि रवी पुजारी गँगचा नेमकी काय संबंध आहे, याचीही चौकशी करण्यात येत आहे.पुजारीच्या नावे फोन करणा-याने मांगले विरुद्धची तक्रार मागे घेण्यास सांगून मोपलवार यांच्याकडे सात कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न दिल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मांगलेदाम्पत्यासह वेदमेहता, भरत तावडे आणि रवी पुजारी या पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत (मकोका) कारवाई केल्याची माहिती शर्मा यांनी दिली.
मांगले दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध मकोका’खाली कारवाई; मोपलवारांना रवी पुजारी टोळीची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 9:46 PM